कलेच्या माध्यमातून क्रांतीसूर्यास नमन

समाज कल्याण विभागाचा उपक्रम
कलेच्या माध्यमातून क्रांतीसूर्यास नमन

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar


क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या विविध भावमुद्रा रेखाटताना कलावंत विद्यार्थी हरवून गेले होते. बाबासाहेबांच्या आयुष्यातील अनेक पैलू आहेत. त्यांनी समाजासाठी केलेलं कार्य हे आपल्या कलाकृतीतून दाखवताना कलावंतांनाही विशेष स्फुरण चढलं होतं. निमित्त होते प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित विभागीय स्तरावरील चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे.

‘सामाजिक न्यायपर्व’ हा अभिनव उपक्रम सद्या सुरू आहे. या अंतर्गत निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे या स्पर्धा पार पडल्या. यात विभागातील शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

स्पर्धेच्या उद्घाटनास चित्रकार आप्पासाहेब काटे, प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ. आरतीश्यामल जोशी व प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री सोनकवडे यांनी केले. त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात कलेचे महत्त्व विशद करताना आपल्यातील कलेमुळे व्यक्तिमत्व विकास होतो. आत्मविश्वास, स्वाभिमान जागा होण्यास मदत होते. तसेच अशा कार्यक्रमांचे माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. महापुरुषांच्या आणि विविध सामाजिक प्रश्नांवर रेखाटल्याने चित्रांच्या आणि रांगोळी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वैचारिक आणि मानसिक प्रबोधन करता येते असे नमूद केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रख्यात चित्रकार आप्पासाहेब काटे यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेचा महत्त्व पटवून दिले. जगातील सात कलांपैकी चित्रकला ही एक कला असल्याचे सांगितले. खऱ्याअर्थाने सौंदर्याची अभिव्यक्ती कलेतून निर्माण व्हावी, असा आशावाद व्यक्त केला. जुन्या काळी कलेला खूप महत्त्व होते. आताच्या काळात तिला व्यावसायिकतेचे स्वरूप आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शिका डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी कला ही मनाला ऊर्जा देत असते. कलेमुळे मन उत्साही होऊन जीवनात सकारात्मक विचार येतात. कलेमुळे पवित्र मन तयार होत असते. कला विधायक गोष्टीकडे घेऊन जाते. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक न्याय भवन विभागातील विद्यार्थ्यांना देशपातळीवर आपलं नावलौकिक करावा, असा आशावाद व्यक्त केला. या चित्रकला स्पर्धेमध्ये दीडशे व रांगोळी स्पर्धेत१४० जणांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास अस्मिता जावळे, वैशाली कळासरे, निर्मला बारसे हे उपस्थित होते सूत्रसंचलन नीलेश भामरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सूर्यकला गोसावी यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com