औरंगाबादमध्ये गोवरचा फैलाव ; ८८ संशयित रुग्णांवर उपचार

औरंगाबादमध्ये गोवरचा फैलाव ; ८८ संशयित रुग्णांवर उपचार

औरंगाबाद - aurangabad

मुंबई, भिवंडी (Mumbai, Bhiwandi) पाठोपाठ शहरालाही गोवरचा (Measles) विळखा पडला आहे. आतापर्यंत ८८ बालके संशयित आढळून आले असून त्यापैकी १७ बालके बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाकडून (Department of Health) सतर्कतेने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी गोवरची आणखी ८ संशयित बालके आढळून आल्यामुळे अतिरिक्त लसीकरण शिबिरे घेतली जात असून आरोग्य उपसंचालक महानंदा मुंढे यांनीही शहरातील विविध भागात फिरून गोवरचे सर्वेक्षण केले.

शहरात गोवरच्या साथीचा झपाट्याने फैलाव सुरू झाला आहे. गेल्या दहा दिवसापासून गोवर साथीचे बालके आढळून येत आहे. बालकांच्या अंगात ताप आणि पुरळ आलेल्या बालकांमध्ये गोवर आढळून येत आहे. गोवर साथीला नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरुवातीपासून उपाययोजना राबविण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे.

शहरात चिकलठाणा, विजयनगर, नेहरूनगर भागात गोवरचा उद्रेक झाला आहे. त्यापाठोपाठ इतर भागातही गोवरची बालके आढळून येत आहे. आतापर्यंत शहरात गोवर साथीचे ८८ संशयित बालके निघाली. त्यापैकी ६१ बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबईच्या हाफकीन प्रयोगशाळेत तपासणी पाठविण्यात आली. हाफकीन प्रयोगशाळेतून ४४ बालकांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यातील १७ बालके पॉझिटिव्ह आढळून आले असून १२ बालकांचा अहवाल प्रलंबित आहे. १५ बालकांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे डॉ. पारस मंडलेचा यांनी
सांगितले.
जयभवानीनगरात गोवरची बालके

या आठवड्यात मात्र गोवर साथीचा शहराला विळखा पडत चालला आहे. दररोज नवीन भागात गोवरची संशयीत बालके आढळून येत आहे. शुक्रवारी गोवरची आठ संशयीत बालके निघाली. त्यात नेहरूनगर, नक्षत्रवाडी, आरेफ कॉलनी, भीमनगर, बायजीपूऱ्यातील रहेमानिया कॉलनी, मिसारवाडीतील साईनगर, सातारा परिसरातील अमेरनगर आणि जयभवानीनगर या भागात निघाले आहेत. या बालकांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

विशेष लसीकरण शिबीर

शहरात सर्वत्र गोवर साथीचे बालके आढळून येत असल्यामुळे महापालिकेने ९ महिने ते ५ वर्षेवयोगटातील बालकांना चिकलठाणा, शिवाजीनगर, विजयनगर आणि नेहरुनगर भागात अतिरिक्त विशेष लसीकरण शिबीर घेण्यात आले. ९ महिने ते ५ वर्षेवयोगटातील १५६ बालकांचे लसीकरणाचा अतिरिक्त डोस देण्यात आले. तसेच नियमितपणे एमआर-१ चा ३८ आणि एमआर-२ चा २४ बालकांना डोस देण्यात आला आहे.


शहरात गोवरचा झपाट्याने फैलाव होत असल्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. तीन भागात गोवरचा उद्रेक झाल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली असून जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हा समन्वयक डॉ. मुजीब शेख, आरोग्य उपसंचालिका डॉ. महानंदा मुंढे यांच्यासह आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला भांमरे, डॉ. संध्या नळगीरकर, डॉ. बाळकृष्ण राठोडकर, डॉ. अर्चना राणे, डॉ. मेघा जोगदंड यांनी विजयनगरमधील मल्हार चौक, जयभवानीनगर भागात जाऊन गोवर बालकांची पाहणी करून सर्वेक्षण केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com