ठाकरेंना हिंदुत्वापेक्षा सत्ता महत्त्वाची ; दरेकरांचा टोला 

ठाकरेंना हिंदुत्वापेक्षा सत्ता महत्त्वाची ; दरेकरांचा टोला 

औरंगाबाद - aurangabad

औरंगजेबाच्या कबरीवर दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या (mim) एमआयएमच्या लोकांची मदत घेता. हेच का तुमचे हिंदुत्व. स्वाभिमान असता तर मतासाठी लाचारी पत्करली नसती. शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे हिंदुत्व व त्यांचे विचार गुंडाळून ठेवले आहेत. त्यांना हिंदुत्वापेक्षा सत्ता मोठी आहे हे त्यांनी दाखवून दिले, अशी खोचक टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी माध्यमांशी बोलताना केली.

याप्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) उपस्थित होते. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर प्रहार करताना, ते म्हणाले, संजय राऊत हे प्रथम क्रमांकाचे उमेदवार असूनही शेवटून पहिले आलेत, हेच राऊत रोज सकाळी उठून वायफळ पोपटपंची करतात. ती त्यांना शोभते का? असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, शिवसेनेला डिवचण्यासाठी म्याव, म्याव असा आवाज सर्वाधिक वेळ काढण्यात आला. महिला कार्यकर्त्याही हा आवाज काढण्यात आघाडीवर होत्या. राज्यसभा तर सुरुवात आहे, विधान परिषद बाकी आहे. औरंगाबाद महापालिकाही आम्ही जिंकू असे भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी सांगितले. तर माजी उपमहापौर संजय जोशी म्हणाले की, राज्यसभेत बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक हरला, पवारांचा सैनिक जिंकला. ही शिवसेनेतील निष्ठावंतांसाठी अखेरची धोक्याची घंटा आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडीत जल्लोष होणार, असे भाजपच्या मीडिया आघाडीतर्फे आधी मेसेज देण्यात आले होते. नंतर उस्मानपुऱ्यातील भाजपचे कार्यालय येथे आनंद साजरा करण्यात येईल, असा बदल करण्यात आला. त्यानुसार मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी जमा झाले. फटाके वाजवून, ढोल-ताशांच्या गजरात पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. माजी उपमहापौर लता दलाल, माजी नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी फुगड्याही खेळल्या. म्याव, म्याव अशी घोषणा देऊन शिवसेनेला डिवचण्यावर भर देण्यात आला होता. शिवसेनेच्या वाघाची मांजर झाली, अशी आठवण करून दिली गेली.

बाण उलटा घुसला आहे

८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादेत सभा झाली. त्यात खासदार संजय राऊत यांचे कट्टर समर्थक, माजी नगरसेवकाने जास्त द्याल ताण तर उलटा घुसेल बाण अशी जाहिरात केली होती. त्याची आठवण करून देत शहराध्यक्ष केणेकर म्हणाले की, शिवसेनेने बाणाचे पावित्र्य ठेवले नाही. त्यामुळे तो त्यांच्याकडेच उलटा घुसला आहे. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माथा टेकवणाऱ्याची मते शिवसेनेने घेतली आहेत. त्याचे परिणाम त्यांना मनपात भोगावे लागणार आहेत. या वेळी बसवराज मंगरुळे, प्रवीण घुगे, भगवान घडमोडे, अनिल मकरिये, राजेश मेहता, समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, दयाराम बसैये, डॉ. राम बुधवंत, अमृता पालोदकर, दीपक ढाकणे, रामेश्वर भादवे, सविता कुलकर्णी, राजगौरव वानखेडे, बबन नरवडे, वर्षा साळुंखे, मनीषा मुंडे, मनीषा भन्साळी, जगदीश सिद्ध, प्रशांत देसरडा आदींची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com