प्रचारासाठी शिवसेनेकडून 'आकाश दिव्यां'चा वापर

प्रचारासाठी शिवसेनेकडून 'आकाश दिव्यां'चा वापर

औरंगाबाद - aurangabad

दिवाळीचे (Diwali) औचित्य साधत महानगरपलिकेचा गड राखण्यासाठी (shivsena) शिवसेना चांगलीच कामाला लागली असून शहरभर लावण्यात आलेल्या आकाशदिव्यातून विकासकामांचा प्रचार सुरू आहे. पालिकेतील कामाची उजळणी करतांनाच केंद्राच्या 'स्मार्ट सिटी'तील कामाचे श्रेयही शिवसेनाच लाटत आहे. सेनेच्या 'निवडणूक दिवाळी' वर विरोधकांनी कडाडून टिका केली असून प्रामाणिकपणे कामे केली असती तर दिव्यांचा शुभेच्छांऐवजी प्रचारासाठी वापर करण्याची गरज भासली नसती, असा टोला (Maharashtra Navnirman Sena) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावला आहे.

पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेनेने यात आघाडी घेतली असून दिवाळ सणातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. शिवसेनेने दिवाळीनिमीत्त शहरभर २०० आकाशदिवे लावले आहेत. ७ बाय ७ फुट आकाराचे दिवे स्टीलच्या फ्रेमवर साकारले असून विजेचे खांब, इमारती तसेच चौकात ते लावले आहेत. प्रत्येक वॉर्डात किमान एक तर महत्त्वाच्या ठिकाणी २-३ दिवे लावल्याची माहिती शिवसेना आमदार व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली.

दिव्यांवर प्रचाराचा मजकूर

निवडणूकीच्या तोंडावर आकाशदिव्यांचा प्रचारासाठी वापर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिव्यांवर विकासात अग्रेसर-शिवसेना संभाजीनगर, शहरासाठी १६८० कोटीची पाणीपुरवठा योजना, शहरातील प्रमुख २३ रस्त्यांसाठी १५२ कोटीचा निधी, गुंठेवारीची घरे नियमीत केले, चिकलठाणा, पडेगाव येथे कचरा प्रक्रिया केंद्र, कांचनवाडीत बायोमिथेन प्रकल्प, ठाकरे स्मृतीवन व स्मारकाचे भूमिपूजन असे मजकूर आहेत.

‘स्मार्ट सिटी’चेही सेनेलाच श्रेय

पालिका तसेच राज्याने शहरासाठी केलेल्या कामांची उजळणी करताना केंद्राचा प्रकल्प असणाऱ्या स्मार्ट सिटीच्या कामाचे श्रेयही शिवसेनेने घेण्याचा प्रयत्न केला आहे. जंगल सफारी पार्कसाठी १७४ कोटी मंजूर, स्मार्टसिटी बसडेपोचे भूमिपूजन, कमांड अँड कंट्रोल सेंटर, आऊटडोअर डिस्प्ले व १०० स्मार्ट बस थांब्यांचे लोकार्पण असा दिव्यांवर मजकूर आहे.

भगवा मोह टाळला

२०० दिव्यांवर १२ ते १५ प्रकारचे आकर्षक मजकूर आहेत. पालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा प्राथमिक अंदाज असल्याने आकाशदिव्यांना भगवा रंग टाळण्यात आला आहे. त्याऐवजी निळ्या आणि काळ्या रंगाचा अधिक वापर आहे. प्रत्येक दिव्यात भक्कम प्रकाशाचा बल्बही आहे.

निवडणूक स्टंट नाही

'विकासदीपा'तून शहरासाठी पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरीकांना या कामाची माहिती नसते. आकाश दिव्यातून ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. याचा राजकारणाशी संबंध नाही.

- आमदार अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख

जनता जागा दाखवेल

शिवसेनेने शहर भकास केले आहे. शहरासाठी केलेले दाखवण्यासारखे एकही काम त्यांच्याकडे नाही. प्रामाणिकपणे काम केले असते तर आकाश दिव्यांवर प्रचाराची गरज भासली नसती. पण जनता सुजाण आहे. येत्या निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

- सुहास दाशरथे, जिल्हाप्रमुख, मनसे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com