40 टक्के औरंगाबादकरांमध्ये ‘अँटीबॉडीज’! 

दुसऱ्या लाटेत एक लाख बाधित
40 टक्के औरंगाबादकरांमध्ये ‘अँटीबॉडीज’! 

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाची (Corona) संभाव्य तिसरी लाट अधिक संसर्गजन्य असण्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला आहे. औरंगाबाद शहरात आजघडीला कोरोना आणि (Vaccination) लसीकरणामुळे सुमारे आठ लाख नागरिकांत अ‍ॅन्टिबॉडीज् (Antibodies) तयार झालेल्या आहेत. पहिल्या लाटेतील सिरो सर्वेक्षण आणि दुसर्‍या लाटेतील लसीकरण यामुळे शहरातील सुमारे 40 टक्के नागरिकांत कोरोनाविरोधात लढणार्‍या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत. मात्र तरीही तिसर्‍या लाटेत सुमारे चार लाख नागरिक बाधित होण्याचा धोका आहे. ऑगस्ट महिन्यात तिसर्‍या लाटेत रुग्ण वाढतील, अशी भितीही व्यक्त केली जात असून महापालिकेने त्याअनुषंगाने सर्व उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे.

मागील काही दिवसांत देशातील 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यांत चौथे राष्ट्रीय सिरो सर्वेक्षण करण्यात आले. या राष्ट्रीय सिरो सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार देशातील सुमारे 40 कोटी नागरिकांना तिसर्‍या लाटेत कोरोना होण्याचा धोका आहे. हा निष्कर्ष जाहीर होताच पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी महिनाभरापूर्वीच याबाबत धोक्याचा इशारा दिला होता. हे आता केंद्र सरकारच्या सिरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षातूनही स्पष्ट झाले आहे. करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी औरंगाबाद शहरात सिरो सर्वेक्षण करण्यात आले, त्यात 17 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या. सप्टेबर ते जानेवारी 2020 दरम्यान ज्यांना कोरोनाची लागण झाली त्या व्यक्तींमध्ये देखील आता अँटीबॉडीज निर्माण झालेल्या आहेत, हे प्रमाण सुमारे वीस टक्के आहे.

शहरात 5 लाख 27 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जानेवारी ते मार्च 2021 दरम्यान 10 टक्के नागरिकांना कोरानाची लागण झाली, त्यामुळे त्यांच्यातही अँडिबॉडिज निर्माण झाल्या आहेत. अँटीबॉडीज शरीरात जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत राहू शकतात. त्यामुळे सिरो सर्वेक्षणात ज्या सतरा टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या, त्यांचा सहा महिन्याचा कालावधी आता संपला आहे. त्याचप्रमाणे पहिल्या लाटेत ज्या वीस टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांच्याही सहा महिन्याचा कालावधी संपल्यात जमा आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या 31 टक्के व्यक्ती आणि जानेवारी ते मार्च दरम्यान कोरोनाबाधित झालेल्या 10 टक्के व्यक्ती अशा केवळ 41 टक्के व्यक्तींमध्येच सध्या अँटीबॉडीज आहेत. हे प्रमाण 70 टक्क्यांवर न्यावे लागणार आहे. त्यामुळे लसीकरणातून आणखीन 29 टक्के व्यक्तींमध्ये अँटीबॉडीज तयार कराव्या लागतील.

आयुक्‍त पांडेय यांच्या अंदाजानुसार शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून या लाटेत शहरासह जिल्ह्यात सुमारे 1 लाख 4 हजारांपर्यंत नागरिकबाधित झाले होते. मात्र आता दुसर्‍या लाटेपेक्षाही तिसरी लाट अधिक भयंकर असण्याचा अंदाज आहे. सध्या शहराची लोकसंख्या 17 लाख गृहित धरली जाते. या लोकसंख्येच्या 70 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले, त्यांच्यात अँटीबॉडीज निर्माण झाल्या तरच शहर सुरक्षिततेच्या परिघात येऊ शकेल.

शहरात लसीकरणाचे उद्दिष्ट 11 लाख 76 हजार 999 इतके ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 5 लाख 27 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. म्हणजे असून 6 लाख 49 हजार 999 नागरिकांचे लसीकरण करावे लागणार आहे. सोबतच 5.27 पैकी अनेकांचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांच्यासाठीही लस उपलब्ध करावी लागणार आहे. मात्र तज्ज्ञांनी ऑगस्ट महिन्यापासून तिसरी लाट सुरू होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तोपर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता कमीच आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com