Monday, April 29, 2024
HomeUncategorizedचिंताजनक... औरंगाबादेत एका दिवसांत आठ बालकांना कोरोना

चिंताजनक… औरंगाबादेत एका दिवसांत आठ बालकांना कोरोना

औरंगाबाद – Aurangabad

जुलै महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून यात बालकांना अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेने आतापासूनच खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच सोमवारी एका दिवसात आठ बालकांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करावे लागल्याचे समोर आले आहे. शहरात आजवर शून्य ते पाच वर्षे वयोगटातील 1323 बालके बाधित झाली आहेत.

- Advertisement -

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्‍या लाटेत बाधितांची संख्या अधिक दिसत आहे. पहिल्या लाटेत शहरातील रुग्णांची संख्या अधिक होती. तर दुसर्‍या लाटेत मात्र शहरी रुग्णांसह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे शासन व प्रशासनासमोर रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यातच मागील काही दिवसांपासून शहरातील बाधितांची संख्या कमी होतानाचे चित्र आहे. मात्र आता कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पालिकास्तरावर आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याची तयारी आतापासूनच सुरु करण्यात आली आहे. पालिकेकडून प्राप्त अहवालानुसार औरंगाबाद पालिकेच्या क्षेत्रात शून्य ते पाच या वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1323 वर पोहोचली आहे. यातच सोमवारी या वयोगटातील आठ रुग्ण दाखल झाले. कोरोनाबाधित बालकांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

अहवालानुसार 5 ते 18 या वयोगटातील शहरातील बाधितांची संख्या 7,530 एवढी झाली आहे. सोमवारी या वयोगटातील 23 जण बाधित आढळले. आता कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या अनुशंगाने बालकांवरील उपचारासाठी सुरु केलेल्या तयारीत शून्य ते 18 वयोगटातील व्यक्ती बालक संवर्गात समाविष्ट केल्या आहेत. त्यानुसार आजवर शहरात 8,853 बालक बाधित निघाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या