मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकाऱ्यांचे होणार निलंबन

बाजारांमध्ये लसीकरणाची सुविधा
मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकाऱ्यांचे होणार निलंबन

औरंगाबाद - aurangabad

आता सर्वकाही अनलॉक होत असताना कोरोनाचा धोका अधिक वाढू नये तसेच लोकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आपल्या जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी  युद्धपातळीवर काम करावे. मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकरी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने, पोलीस उपअधीक्षक श्री. बनसोड, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, मनपा आरोग्य अधिकारी मंडलेचा, संपर्क अधिकारी,आरोग्य अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यातील लसीकरणाचा आढावा घेत मार्गदर्शक सूचना केल्या.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या भागामध्ये लसीकरण कमी आहे अशा भागांमध्ये तलाठी, तहसीलदार, ग्रामसेवक,बीडीओ तसेच आरोग्य अधिकारी यांनी सकाळी दहाच्या आधी व सायंकाळी सहा नंतर प्रत्यक्ष भेटी द्याव्यात. तसेच तेथील लोकांचे लासीकरणासंबंधी प्रबोधन करावे. बाजाराच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमतात त्यामुळे बाजाराच्या ठिकाणी देखील लसीकरण केंद्र उभारावेत.

लसीकरणाला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज ओळखून शहरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी ऐच्छिक 'आशा कर्मचारी' नेमावेत. आरोग्य कर्मचारी वेळेवर कामास उपस्थतीत नसेल अथवा अधिकरी कर्मचारी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसतील तर त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले. तसेच लोकांना हव्या त्या वेळेत लसीकरण करता यावे यासाठी लवकरात लवकर घाटी येथे तळमजल्यावर मानसोपचार वॉर्डजवळ तसेच जिल्हा रुग्णालय चिकलठाणा येथे अशा दोन ठिकाणी २४ तास लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

लसीकरणासंदर्भात लोकांचे प्रोबोधन व्हावे यासाठी सर्व डॉक्टरांना रुग्णांचे vaccination certificate तपासणे बंधनकारक करण्यात येणार असून लसीकरण न केलेल्या रुग्णाला लसीकरणाचे महत्व समजून सांगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com