आता 'नो व्हॅक्सिन, नो लिकर'चा नियम

तळीरामांचे होणार हाल
आता 'नो व्हॅक्सिन, नो लिकर'चा नियम

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यातील परवानाधारक मद्यविक्री दुकाने, (Wine, beer shop) वाइन, बिअर शॉपी, देशी दारूची दुकाने, बिअर बार आदी आस्थापनांत कार्यरत कामगारांची लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय किमान एक डोस घेतलेल्या ग्राहकालाच यापुढे मद्यखरेदीची मुभा राहणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास अशी दुकाने सील केली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी (Collector) तथा जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी दिला आहे.

जिल्ह्यात कोव्हिड लसीकरण (Covid vaccination) मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने मंगळवारी मार्गदर्शक सूचना व आदेश जारी करण्यात आले. त्यांची अंमलबजावणी २५ नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने, वाइन व बिअर शॉपी, बार, देशी दारूची दुकाने, एफएल ३ अनुज्ञप्तीधारक विक्रीची ठिकाणे आदी आस्थापनांत कार्यरत कामगारांनी कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस घेतल्याची खातरजमा संबंधित आस्थापनाच्या मालकांनी करावी. लशीचा किमान एक डोस घेतलेले कामगार असतील, अशी मद्यविक्रीची दुकाने चालू ठेवण्यास मुभा असेल. याशिवाय लशीचा किमान एक डोस घेतलेल्या ग्राहकांनाच मद्यखरेदीची मुभा असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास अशी दुकाने सील केली जाणार आहेत. जिल्ह्यात अधिक जोमाने लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. अन्य एका आदेशात किराणा दुकाने, बहु उत्पादन विक्री दुकाने व आस्थापना, तसेच हॉटेल, धाबे, भोजनालय, खानावळी यात कार्यरत सर्व कर्मचारी, कामगारांची लसीकरण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com