Monday, April 29, 2024
HomeUncategorized'शिवभोजन थाळी' आता रडारवर

‘शिवभोजन थाळी’ आता रडारवर

औरंगाबाद – aurangabad

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय (Collector Astikkumar Pandey) यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा विभागाच्या (District Supply Department) पथकाने शहरातील ३५ शिवभोजन केंद्रांची (Shiv Bhojan Center) तपासणी केली असून यात ५ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV cameras) नसल्याचे तर दोन केंद्रांवर अन्नपदार्थ तयार नसल्याचे आढळून आले. या सर्व केंद्रांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच अन्न तयार नसलेल्या केंद्रांवर कारवाईचा इशारा देत सर्व केंद्रांना स्वच्छता राखण्यासह दर्जेदार भोजन वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले.

- Advertisement -

औरंगाबाद जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० पासून शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे. यात आतापर्यंत जिल्ह्यात ५७ केंद्रे असून त्यांतील ३६ केंद्रे शहरात आहेत. या केंद्रांतून दररोज ४ हजार १०० गरीब व गरजू लाभार्थींना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येते. नुकतेच रुजू झालेले जिल्हाधिकारी पांडेय यांनी पुरवठा विभागाच्या पथकामार्फत या शिवभोजन केंद्रातून पुरवण्यात येणार्‍या शिवभोजन व्यवस्थेची तपासणी केली. यात केंद्रातील स्वच्छता, लाभार्थींना देण्यात येणारे शिवभोजन गुणवत्तापूर्ण आहे की नाही, याची पाहणी करण्यात आली. दरम्यान, उपजिल्हाधिकारी तसेच स्थानिक तहसीलदार यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत पाच शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे आढळले, तर दोन केंद्रांवर अन्नच तयार नव्हते. 

या पथकाने सदरील अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केला आहे, यात पाच केंद्रांना नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले. तसेच तातडीने कॅमेरे बसविण्याची सूचनाही केली, तर ज्या केंद्रांवर अन्न तयार नव्हते, त्यांच्याविरोधात मात्र कारवाई केली जाण्याची दाट शक्‍यता आहे. दरम्यान, शिवभोजन थाळीसाठी १० रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारणाऱ्या केंद्रांची तक्रार लाभार्थ्यांनी तातडीने दाखल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले-नेटके यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या