
छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar
दुचाकी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता आता छत्रपती संभाजीनगर शहरात इंट्री करतानाच हेल्मेट तपासले जाणार आहे. अपघात टाळण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या पथकाने कंबर कसली असून शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये, औद्योगिक परिसरातील विविध कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर विनाहेल्मेटधारकांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत आतापर्यंत विनाहेल्मेट असलेल्या ६०० दुचाकीधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
आजघडीला सर्वाधिक अपघात हे दुचाकीस्वारांचे होत आहेत. त्यातही दरवर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात साडेसहाशे दुचाकीस्वारांचा मृत्यू हा हेल्मेट न घातल्यामुळे झाल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ७० टक्के दुचाकीस्वारांचा मृत्यू हा हेल्मेट न घातल्यामुळे होतो. त्यामुळे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, राज्य रस्ता सुरक्षा कक्षाचे प्रमुख आणि उपायुक्त भरत कळसकर यांच्या उपस्थितीत मे महिन्यात झालेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत हेल्मेट न घातल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू रोखण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत धडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय कोठाळे यांनी थेट हेल्मेट तपासणी मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत आतापर्यंत विनाहेल्मेट वाहन चालविल्याप्रकरणी ६०० पेक्षा जास्त चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
आरटीओ कार्यालयाने शहरातील शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये, औद्योगिक परिसरातील विविध कंपन्या यांना पत्र पाठविले आहे. त्या पत्रात आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी किंवा कामगार असलेल्या दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याची सक्ती करावी, विनाहेल्मेट कार्यालयात, महाविद्यालयात अथवा कंपन्यांनी आत येऊ देऊ नये. अन्यथा सीसीटीव्ही तपासून विनाहेल्मेट वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आरटीओ कार्यालयाने हेल्मेट तपासणी मोहिमेसाठी चार पथके नियुक्त केली आहेत. पहिली कारवाई करोडी येथील आरटीओ कार्यालयात करण्यात आली.