अरेरे... महाराष्ट्रात हवेच्या गुणवत्तेची माहितीच नाही!

केंद्राकडे क्षणाक्षणाची आकडेवारी
अरेरे... महाराष्ट्रात हवेच्या गुणवत्तेची माहितीच नाही!

औरंगाबाद - aurangabad

स्कॉटलंड येथे झालेल्या (Climate change) हवामान बदल परिषदेत जागतिक पुरस्कार मिळवणारे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) यांच्या महाराष्ट्रात हवा गुणवत्तेची माहितीच उपलब्ध नाही. या माहितीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) संकेतस्थळ प्रमाण समजले जाते. देशभरात प्रदूषणाची 'रिअल टाईम' आकडेवारी मिळत असताना टेक्नोसेव्ही आदित्य यांच्या खात्याच्या संकेतस्थळावर ३-४ महिने जुनी माहिती उपलब्ध आहे.  

ग्लास्गो येथे ३१ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित २६ व्या जागतिक हवामान बदल परिषदेत महाराष्ट्राला "प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व' पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी ७ ते १२ नोव्हेंबरदरम्यान आदित्य ग्लास्गो दौऱ्यावर होते. मात्र, पर्यावरण संवर्धनासाठी पुरस्कार स्वीकारत असतांना राज्याच्या पर्यावरणात महत्त्वाचा घटक असणाऱ्या हवेच्या गुणवत्तेची माहितीच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

संकेतस्थळावर जुनी माहिती

एमपीसीबीचे संकेतस्थळ आणि 'एअर क्वालिटी स्टेटस ऑफ महाराष्ट्र २०१९-२०' नुसार मंडळाच्यावतीने राज्यातील ३१ शहरात ९१ एअर मॉनिटरिंग स्टेशन्स चालवले जातात. येथे हवेच्या गुणवत्तेच्या चाचण्या होवून त्याची माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाते. सद्या यावर ३-४ महिने जुनी आकडेवारी आहे.

शहर आणि अखेरची तारीख

मुंबई-सायन (२९ जून), वांद्रे (१२ सप्टेंबर), म्हापै (२६ ऑक्टो.) तर कल्याण, वसई, नेरळ, कांदीवली, मुलूंड, बोरीवली, विले पार्ले, कुर्ला, पवई, आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलाबा, सोम्मय्या हॉस्पीटल येथे २० सप्टेंबर २०२१ नंंतरची माहिती नाही. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातही हीच स्थिती आहे.

नागपूर-सिव्हील लाईन्स (१३ सप्टेंबर), विभागीय आयुक्त (२६ ऑक्टोबर), अंबाझरी रोड (२८ सप्टेंबर), हिंगणा रोड (३० सप्टेंबर), सदर (२४ सप्टेंबर)

औरंगाबाद-वाळूज (१६ सप्टेंबर), कडा कार्यालय (१२ डिसेंबर २०१८), सभु महाविद्यालय (१४ सप्टेंबर), जिल्हाधिकारी कार्यालय (१८ सप्टेंबर)

पुणे-पिंपरी चिंचवड मनपा (३१ ऑगस्ट), कर्वे रोड (१३ सप्टेंबर), एमएसईबी आफीस (३० सप्टेंबर), भोसरी (२२ जानेवारी), स्वारगेट (२७ सप्टेंबर)

नाशिक-उद्योग भवन (३१ जुलै नंतर थेट ३१ ऑक्टोबर), केटीएचएम कॉलेज (१६ सप्टेंबर), एमआयडीसी सातपूर (३१ जुलै), आरटीओ कॉलनी (३० जुलै), मनपा (२९ जुलै). अन्य शहरांचीही अशीच स्थिती आहे.

केंद्राचा रिअल टाईम डेटा

केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स काढला जातो. यासाठी मंडळाने राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, चंद्रपूर, पुणे आणि सोलापूर या १० शहरात ४१ कंटिन्यूअस अँबीयंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम बसवले आहेत. येथे २४ तास हवेच्या गुणवत्तेच्या चाचण्या होवून मंडळाच्या संकेतस्थळावर त्याची रिअल टाईम म्हणजेच क्षणाक्षणाची माहिती अपडेट केली जाते.

आमची चूक नाही

एका मॉनिटरिंग स्टेशनचे कर्मचारी म्हणाले, आम्ही कमी मणुष्यबळात तोकड्या मानधनावर काम करतोय. नियमितरित्या मंडळाला आकडेवारी देतो. संकेतस्थळावर ती अपडेट होत नसेल तर ती मंडळाची चूक आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com