ढगाळ वातावरणाने घालवले चंद्रग्रहणाचे 'दर्शन'

औरंगाबादकरांचा हिरमोड
ढगाळ वातावरणाने घालवले चंद्रग्रहणाचे 'दर्शन'
Sandip Tirthpurikar

औरंगाबाद - aurangabad

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कार्तिक पौर्णिमेस (Kartik Purnima) म्हणजेच मंगळवारी खंडग्रास स्थितीत झाले. १५ दिवसांत होणारे हे दुसरे ग्रहण होते. हे भारतासह उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, उत्तर पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागरात देखील दृश्यमान होते. परंतु, औरंगाबादेत ढगाळ वातावरणामुळे गोगाबाबा टेकडीवर आयोजित कार्यक्रमात खगोलप्रेमी नागरिक, विद्यार्थ्यांची निराशा झाली.

या वेळेस चंद्रग्रहण सुरू असतानाच पूर्व क्षितिजावर चंद्र उगवल्यामुळे या ग्रहणाला ग्रस्तोदित चंद्रग्रहण असेही म्हटले गेले. हे ग्रहण नुसत्या डोळ्यांनी पाहणे शक्‍य होते. हे चंद्रग्रहण पूर्व आकाशात उगवताना दिसणार असल्याने ब्लडमून पाहण्याची मजा येणार होती. मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण असल्याने शहरात चंद्रग्रहण पाहता आले नाही. अनेकांनी टीव्हीवर चंद्रग्रहणाचा आनंद घेतला. 


मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात हे खंडग्रास चंद्रग्रहण दिसून आले. मराठवाड्यातील सर्व प्रथम नांदेड व हिंगोली येथे सायंकाळी ५:४२ बाजता तर सर्वात शेवटी औरंगाबाद येथे सायंकाळी ५:५० बाजता चंद्रोदय ग्रहण स्थितीतच झाले. तर औरंगाबादेत ग्रहण कमाल ग्रासण्याची वेळ ही ५:५७ वाजता होती. यावेळेस पृथ्वीच्या दाट छायेत चंद्र साधारणत: नांदेड व हिंगोली येथे सर्वात जास्त ५२ टक्के तर औरंगाबाद येथे सर्वात कमी ३३ टक्क्यांनी ग्रासलेला दिसणार होता. सायंकाळी ६:१९ दरम्यान चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीतून विरळ छायेत प्रवेश करेल व रात्री ७:२६ वाजता ग्रहण समाप्ती होणार होती. ती झाली देखील मात्र ढगाळ वातावरणामुळे हे विलोभनीय
दृश्य पाहण्यापासून औरंगाबादसह अनेक ठिकाणी नागरिक वंचित राहिले.


दरम्यान, अनेक नागरिकांनी चंद्रग्रहण पाहणे टाळले. या काळात अन्नसेवन केले नाही. तर सर्व खाद्यपदार्थांवर तुळशीपत्र ठेवले होते. ग्रस्तोदित चंद्रग्रहण दर्शन या खगोलीय उपक्रमाचे आयोजन सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेदरम्यान या ग्रहणाचे छायाचित्रण व अभ्यास गोगाबाबा टेकडीवरून केला जाणार होता. यावेळेस दुर्बिणीतून या ग्रहणाचे निरीक्षण करण्याची संधी मिळणार होती. ग्रहणातच चंद्रोदय होताना दिसणार असल्याने हौशी छायाचित्रकारांना या ग्रहणाचे फोटो काढण्याची ही एक पर्वणीच ठरणार होती. मात्र, सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हौशींना चंद्रग्रहणाचा आनंद घेता आला नाही. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com