Zika Virus : करोनानंतर आता 'झिका विषाणू'चा धोका, 'या' राज्यात आढळला पहिला रुग्ण

Zika Virus : करोनानंतर आता 'झिका विषाणू'चा धोका, 'या' राज्यात आढळला पहिला रुग्ण

जाणून घ्या या आजाराची लक्षण, उपचार

दिल्ली | Delhi

जवळपास गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाशी दोन हात करत आहे. देशात करोनाची दुसरी लाट जवळपास ओसरत असतानाचा तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात आली. दरम्यान, देशात करोनापाठोपाठ आता एका नव्या विषाणूची एन्ट्री झाली आहे.

गुरुवारी केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. १४ जणांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

झिका विषाणूचा प्रसार हा एडीस प्रकारचा डास चावल्याने होतो. एडीस प्रकारच्या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप असे आजारही होतात. झिका विषाणूचा प्रसार गर्भवती महिलेला झाल्यास तिच्या गर्भातही या विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपत्यामध्ये काहीतरी कमतरता निर्माण होते. या रोगाचा प्रसार साधारणपणे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रात होतो. एडीस प्रकारातील डास हा शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी चावतो. सध्या जगातील ८६ देशांमध्ये या प्रकाराचे डास आढळतात. १९४७ साली आफ्रिकेत या रोगाचा शोध लागाला होता.

झिका विषाणूची लक्षणं

ताप येणे, अंग दुखणे, तसेच अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे हे झिका विषाणूची प्राथमिक लक्षणं आहेत. या दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा देखील जाणवतो. दरम्यान झिका विषाणूच्या संसर्गानंतर त्याचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर प्रत्यक्ष रोगाला निर्माण होण्याचा काळ हा ३-१४ दिवस आहे. तर लक्षणं २-७ दिवस राहू शकतात. WHO च्या माहितीनुसार अनेकांना झिका विषाणूची लागण झाली तरी लक्षणं दिसत नाहीत.

झिका विषाणूपासून बचावासाठी काय कराल?

अद्याप झिका विषाणूवर उपचार किंवा इंजेक्शन नाही. UN चा सल्ला आहे की ज्यांना लक्षणं आढळतील त्यांनी पुरेसा आराम करावा, शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राखावं, वेदना आणि ताप दोन्हींना सामान्य औषधांच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करावा. झिका विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सध्या केवळ डासांना दूर ठेवणं इतकाच आहे. शक्यतो गरोदर महिला, आई होण्याच्या वयातील मुली, स्त्रिया आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com