दिल्ली | Delhi

अमेरिकेच्या संसदेवर हल्ला करण्यासाठी आपल्या समर्थकांनी चिथावणी दिल्याचा आरोप असलेले मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामनंतर आता युट्युबनेही धक्का दिला आहे.

यूट्यूबने बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे म्हटलं आहे.

“सध्या सुरु असणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला नवीन कंटेट (व्हिडीओ) काढून टाकला आहे. हा कंटेट आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा आहे,” असं यूट्यूबने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे. “या चॅनेलवरुन आता ‘किमान’ सात दिवस नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही”, असंही कंपनीने पत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे. याचाच अर्थ ट्रम्प आता अध्यक्षपदावर असतानाच यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोणताही व्हिडीओ अपलोड करु शकत नाहीत.