
नवी दिल्ली | New Delhi
जागतिक कुस्ती महासंघाने (United World Wrestling) भारतीय कुस्ती महासंघाची (Wrestling Federation of India) सदस्यता रद्द केली आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या ४५ दिवसांत निवडणुका होऊ न शकल्याने जागतिक कुस्ती महासंघाने ही सदस्यता रद्द केल्याची माहिती समोर आली आहे...
भारतीय कुस्ती संघटनेच्या १२ ऑगस्ट रोजी निवडणुका होणार होत्या. मात्र, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मतदानाच्या एक दिवसाआधी निवडणुकीला स्थगिती दिली होती. याआधी ११ जुलै रोजी निवडणुका होणार होत्या. परंतु आसाम कुस्तीगीर संघटनेने आपल्या मान्यतेबाबत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सुनावणी झाल्यावर आसाम उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. यानंतर ऑगस्टमध्ये देखील निवडणुका होऊ शकल्या नाहीत.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत त्यांच्याविरोधात चार ते पाच महिने आंदोलन केले होते. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित केले होते. या पदाधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर महासंघाचे काम तडकाफडकी समिती पाहत होती.