स्टेट बँक कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमची मुभा

वाचणार एक हजार कोटी
स्टेट बँक कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमची मुभा

मुंबई - करोना संकटाच्या काळात घरूनच काम करण्यास अनेक संस्था प्राधान्य देत असतानाच, आता देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी असलेल्या स्टेट बँकेने आपल्या कर्मचार्‍यांना घरूनच नव्हे, तर ते जिथे असतील तिथून काम करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बँकेची सुमारे एक हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.

स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. कर्मचार्‍यांना कुठूनही काम करता यावे, यासाठी मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. यामुळे बँकेच्या खर्चात मोठी कपात होणार असल्याचे त्यांनी बँकेच्या 65 व्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना सांगितले.

स्टेट बँकेने खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचार्‍यांचे कौशल्य सुधारणे आणि उत्पादकता वाढविण्यासाठी बँक आता लक्ष देणार आहे. बँक कर्मचार्‍यांना शाखांमधून बाहेर काढून विक्री कार्यालयांमध्ये आणण्यासाठीही प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले. आम्ही आपल्या कर्मचार्‍यांना घरून व इतर ठिकाणाहून काम करण्याची परवानगी देत असलो, तरी असे करताना बँक सामाजिक आयुष्य आणि कामाच्या वेळेतील आयुष्य यात संतुलन ठेवणार आहे.

फक्त करोनाकाळातच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. करोनाचे संकट आजही कायम असल्यामुळे 2020-21 हे वर्ष अन्य बँकांप्रमाणे स्टेट बँकेलाही कठीण जाणार आहे. बँकेच्या कर्जदारांनाही मदत मिळण्यासाठी पाऊल उचलले जात आहे, असेही कुमार म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com