दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनावरील लस पुढच्या काही दिवसात उपलब्ध होईल अशी घोषणा केलेली असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली होती. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिला डोस घेतलेले हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना करोनाची लागण झालेली आहे.

याचाच अर्थ करोनाची लस घेतल्यानंतरदेखील त्यांना लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे या लसीबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली असताना याबाबत भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे.

भारत बायोटेकने निवेदनात म्हटले आहे की, 'आमची क्लिनिकल ट्रायल ही दोन डोसवर आधारित आहे. त्यासाठी २८ दिवस द्यावे लागतात. म्हणजेच कोवॅक्सिन लसीची कार्यक्षमता ही दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी निश्चित केली जाऊ शकते.' तसेच 'चाचणीचा भाग म्हणून ५० ट्कके सहभागींना ही लस मिळाली तर इतरांना प्लेसबो देण्यात आला होता. फेज-३ मधील ट्रायल ही दुप्पट करण्यात आली होती. यात ५० टक्के सहभागींना लस देण्यात आली तर उर्वरितांना प्लेसबो देण्यात आला.' असे भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिले आहे.

अनिल विज यांनी स्वेच्छेने भारत बायोटेकच्या मानवी चाचणीत भाग घेतला होता. यामध्ये २५,००० पेक्षा अधिक लोकांना चाचणी डोसेस देण्यात आले होते. २० नोव्हेंबर रोजी विज यांना हा डोस देण्यात आला होता. ते हरयाणातील करोनाच्या लसीचा डोस घेणारे पहिले व्यक्ती ठरले होते. त्याचबरोबर हरयाणातील ४०० लोकांनाही कोवॅक्सिनचा डोस देण्यात आला यामध्ये रोहतकचे पीजीआयएमएस विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ओ पी कार्ला यांचाही समावेश आहे.

रोहतकच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या टीमने अंबाला कॅन्टोन्मेट सिविल हॉस्पिटलमध्ये विज यांना लस दिली होती. त्यानंतर त्यांची प्रकती आणि शरिरातील प्रमुख अवयवांचे निरीक्षण दर आठवड्यांनी केले जात होते.

दरम्यान, जननायक जनता पार्टीचे तीन जणांचे शिष्टमंडळ वीज यांना शुक्रवारी भेटले होते. हरियानात आंदोलनकारी शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावेत अशी मागणी त्यांच्याकडे करण्यासाठी ते वीज यांना भेटले होते. त्यांच्या आधी योग गुरू रामदेव बाबा वीज यांना मंगळवारी भेटले होते. त्यामुळे आता या सर्वांनाही करोना चाचण्या करण्याची सुचना करण्यात आली आहे.