दिल्ली । Delhi

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरातील नागरिकांना जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने खुशखबर दिली आहे. फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपातकालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे.

करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. “संपूर्ण जगाला करोना लस उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे,” असं जागतिक आरोग्य संघटनेचे मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटलं आहे. मॅरिएंगेला सिमाओ यांच्यावर औषधं उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आहे.

“प्राथमिकता असणार्या लोकसंख्येपर्यंत लस पोहोचावी यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात जागतिक प्रयत्नाची गरज आहे यावर मी भर देऊ इच्छिते,” असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. आपत्कालिन वापरासाठी परवानगी देण्यात आल्याने अनेक देशांमधील नियामक प्रशासनाला करोना लसीच्या आयात आणि वितरणाला परवानगी देण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनने ८ डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती.