पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांचा लॉकडाऊन

कधीपासून होणार लॉकडाऊनला सुरुवात?
पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांचा लॉकडाऊन

कोलकाता | Kolkata

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा एकदा करोनानं डोकं वर काढल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं चित्र आहे.

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राज्यात १६ मे रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून या लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. ३० मे रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू राहील. याशिवाय शाळा - महाविद्यालयांशिवाय मेट्रो आणि बस सेवाही पूर्णत: बंद राहणार आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. याबाबतचे आदेश आता जारी करण्यात आले आहेत. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही करोनाचा ससंर्ग कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. तसंच राज्यात वैद्यकीय सुविधा पुरवण्याचाही प्रयत्न केला.

पश्चिम बंगालमध्ये बेड्सची संख्या वाढवून ती 30 हजार इतकी करण्यात आली आहे. राज्यात सर्व मेडिकल कॉलेजेसना ऑक्सिजन प्लांट उभारण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच गरजेनुसार बेड वाढवण्याची सूटही रुग्णालयांना दिली आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या छोट्या भावाचं करोनामुळे निधन झालं आहे. करोनाबाधित असीम बॅनर्जी यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी त्यांनी रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. कोलकातातील मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. असीम बॅनर्जी यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोविड प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील असं कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com