Omicronची धास्ती! 'या' राज्यात मिनी लॉकडाऊन; शाळा, कॉलेज, पर्यटन स्थळे बंद

Omicronची धास्ती! 'या' राज्यात मिनी लॉकडाऊन; शाळा, कॉलेज, पर्यटन स्थळे बंद

दिल्ली | Delhi

देशात ओमिक्रॉनमुळे (Omicron) करोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठा निर्णय घेत राज्यात मिनी लॉकडाऊन लावला आहे. त्याबाबत लगेचच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासगी व सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही ५० टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल सरकारने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा कर्फ्यु देखील लावला आहे. या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे. या निर्णयामुळे सोमवारपासून (३ जानेवारी) पश्चिम बंगालमध्ये शाळा, महाविद्यालयांसोबतच जलतरण तलाव, व्यायामशाळा, ब्युटी सलून्स देखील बंद राहतील.

तसेच मुंबई आणि दिल्लीत करोना आणि ओमिक्रॉनबाधितांची संख्या वाढल्याने पश्चिम बंगाल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि दिल्लीहून कोलकातासाठी दररोज उड्डाण घेणाऱ्या विमानांवर आता बंदी घालण्यात आली. पश्चिम बंगाल सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि दिल्लीहून कोलकाता विमानतळावर येणाऱ्या विमानांना आठवड्यातील फक्त दोन दिवसच परवानगी दिली आहे. या दोन्ही शहरांमधून येणाऱ्या विमानांना फक्त सोमवार आणि शुक्रवारसाठी परवानगी देण्यात आली आहे. हे नियम ५ जानेवारीपासून लागू होतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र आणि केरळ पाठोपाठ सध्या पश्चिम बंगाल राज्यात करोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. बंगालमध्ये शनिवारी (१ जानेवारी) तब्बल ४ हजार ५१२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले होते. विशेष म्हणजे त्यादिवसाआधी २ हजार ३५१ रुग्ण आढळले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने होतोय, हे स्पष्टपणे दिसतंय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com