दिल्ली | Delhi

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत जो बायडन यांच्या विजयाच्या घोषणेनंतरही विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अजूनही आपला पराभव मान्य करण्यास तयार नाहीत. त्याचे प्रत्यंतर यूएस कॅपिटलमध्ये (संसद) हिंसाचारात झाल्याचे दिसून आले आहे. या हिंसाचारात एका महिलेचा मृत्यूही झाला आहे. अभूतपूर्व गोंधळानंतर वॉशिंग्टनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या निकालानंतर वादग्रस्त ट्विट केल्यामुळे ट्विटरने त्यांचे अकाऊंट 12 तासांसाठी ब्लॉक केले होते. तसंच वादग्रस्त ट्विट न हटवल्यास अकाऊंट कायमस्वरुपी बॅन करण्याचा इशाराही ट्विटरकडून देण्यात आला होता. त्याचप्रमाणे फेसबुक आणि युट्युबने देखील डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त व्हिडिओज हटवले आहेत. त्याचबरोबर त्यांचे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटही तात्पुरते ब्लॉक करण्यात आले आहे. दरम्यान, युएस कॅपिटल इमारतीला लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचबरोबर आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून इतर इमारती देखील रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

यावरुन निवडून आलेले अध्यक्ष जो बायडन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हा विरोध नसून देशद्रोह आहे अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. “कॅपिटॉल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत. कायदा न मानणाऱ्यांची ही छोटी संख्या आहे. हा देशद्रोहाचा मार्ग आहे आणि तो थांबला पाहिजे”, असं बायडेन म्हणालेत.

"युएस कॅपिटल इमारतीत झालेल्या हिंसाचार हा अमेरिकेच्या इतिहास सदैव लक्षात राहील आणि एका पराभव झालेल्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही आपल्या देशासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे," असे अमेरिकीचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.