उत्तराखंड : आतापर्यंत 30 मृतदेह सापडले ; 197 बेपत्ता

उत्तराखंड : आतापर्यंत 30 मृतदेह सापडले ; 197 बेपत्ता

डेहराडून -

उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यातील जोशीमठाच्या परिसरात रविवारी (7 फेब्रुवारी) सकाळी दहाच्या सुमारास नंदादेवी नदीजवळील

महाकाय हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीला आलेल्या महापूरामुळे पर्वतीय क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले आहे.

या महापूरात 13 गावे आणि दोन भव्य जलऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त झाले आहेत. जलऊर्जा प्रकल्पावर काम करणार्‍या कामगारांपैकी आणि गावकर्‍यांपैकी 197 जण अद्याप बेपत्ता आहेत. आतापर्यंत 30 मृतदेह सापडले आहेत. बोगद्यात अडकलेल्या 30 जणांना बाहेर काढण्याचे अटीतटीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आज संध्याकाळी ऋषी गंगा आणि रैनी गाव येथे पाऊस सुरू झाल्याने बचावकार्यात प्रचंड अडचणी आल्या.

ऋषी गंगा येथील 132 मेगावॅटचा ऋषी गंगा जलविद्युत प्रकल्प आणि तपोवन येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचा 520 मेगावॅटचा भव्य जलविद्युत प्रकल्पही या महाप्रलयात वाहून गेला आहे. या प्रकल्पाच्या चार टनल्स मध्ये चिखल आणि गाळ शिरला आहे.

यापैकी एका टनेल मध्ये अद्यापही 30 कर्मचारी अडकले असल्याने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अडकलेल्या कर्मचार्‍यांपैकी 27 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. आतापर्यंत या टनेल मधील 150 मीटरपर्यंतचा गाळ आणि चिखल काढण्यात आला आहे. बांधकाम सुरू असलेल्या एनटीपीसीच्या विद्युत प्रकल्पातील 139 कामगार आणि ऋषी गंगा जलविद्युत प्रकल्पातील 46 कामगार आणि 12 ग्रामस्थ अद्याप बेपत्ता आहेत.

मृत झालेल्या कामगारांची ओळख पटविण्यासाठी त्यांचे कुटुंबीय कामगारांचे फोटो घेऊन तपोवन येथे आले आहेत. रैनीगावसहित अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जखमींना आणि गावकर्‍यांना इतरत्र नेण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरचा उपयोग करण्यात येत आहे. एनडीआरएफ, इंडो- तिबेटियन बॉर्डर फोर्स, एसडीआरएफ, भारतीय लष्कराचे जवान आणि निमलष्करी दले, अपघात स्थळी आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना मदत आणि बचावकार्य करण्यात गुंतले आहेत. बचावासाठी एमआय- 17, चिनू आदी हेलिकॉप्टर्स डेहराडून ते जोशीमठ अशा फेर्‍या मारीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com