अमेरिकेने फोडला 'स्पाय बलून'; चीनचा जळफळाट, अमेरिकेला थेट इशाराच दिला!

अमेरिकेने फोडला 'स्पाय बलून'; चीनचा जळफळाट, अमेरिकेला थेट इशाराच दिला!

दिल्ली | Delhi

अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अमेरिकेने आपल्या सागरी क्षेत्रावर गिरट्या घालणाऱ्या संशयास्पद चिनी बलून काल पेंटागॉनकडून पाडण्यात आला. अमेरिकेच्या फायटर जेट्सनी ही कारवाई करत हा बलून फोडला.

अमेरिकेच्या कॅरोलाईना सागरी तटावर हा बलून उडत होता. या प्रकरणाची संपूर्ण माहिती अध्यक्ष बायडन यांना देऊन अखेर यूएस एअरफोर्सने हा बलून फोडला. हा बलून आपलाच असल्याचं चीनने मान्य केलं होतं. पण हेरगिरीचे आरोप चीनने फेटाळले होते.

अमेरिकेच्या या कारवाईमुळे चीनचा तीळपापड झाला आहे. बलून पाडल्याचं वृत्त समोर येताच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. "आम्हाला हा मुद्दा शांतीपूर्ण पद्धतीनं हाताळायचा होता. पण अमेरिकेनं आमचं सिविलियन एअरशिप (हेरगिरी बलून) पाडलं आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. अमेरिकेनं या कारवाईमधून आंतरराष्ट्रीय मानकांचं उल्लंघन केलं आहे.

चीन आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. आम्ही याआधी अमेरिकेसोबत याबाबत अनेकदा चर्चा केली. सिविलियन एअरशिप चुकून अमेरिकेच्या हवाईहद्दीत गेल्याचं आम्ही सांगितलं होतं. हा एक फक्त अपघात होता. अमेरिकेच्या सैन्याला या बलूनचा कोणताही धोका नव्हता हे आम्ही याआधीही सांगितलं होतं", असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

चिनी बलून, अंदाजे तीन बसेसच्या आकाराचा, यूएस एअरस्पेसमध्ये ट्रॅक करण्यात आला होता, असे पेंटागॉनने शुक्रवारी सांगितले होते. हा चिनी बलून पाळत ठेवत असल्याचे सांगितले जात होते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी चीनने अमेरिकेच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा निषेध म्हणून बीजिंगचा त्यांचा आगामी दौरा रद्द केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com