अमेरिका पुन्हा बनविणार अणुबॉम्ब
देश-विदेश

अमेरिका पुन्हा बनविणार अणुबॉम्ब

70 हजार कोटी खर्च करणार

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

वॉशिंग्टन - बदलती जागतिक परिस्थिती आणि चीनचा वाढता धोका लक्षात घेता अमेरिकेने पुन्हा एकदा नव्याने अणुबॉम्ब बनवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी येत्या दहा वर्षांत औद्योगिक उत्पादनात सुमारे 70 हजार कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. हे उत्पादन कॅरोलिनामध्ये ‘सवाना’ नदी किनार्‍यावरील एका कारखान्यात आणि न्यू मेक्सिकोतील लॉस अल्मोसमध्ये होईल.

अमेरिका आणि रशियातील शीतयुद्धाच्या वेळी सवाना नदीवरील कारखान्यात अमेरिकेच्या अण्वस्त्रांसाठी ट्रिटियम आणि प्लुटोनियमचे उत्पादन व्हायचे. 2 लाख एकरमध्ये उभारलेल्या या कारखान्यात हजारो लोक काम करायचे. आता येथे 3 कोटी 70 लाख गॅलन रेडिओअ‍ॅक्टिव्ह कचरा जमा झाला आहे. 30 वर्षांनंतर आता पुन्हा येथे अण्वस्त्र तयार केली जाणार आहेत.

अमेरिकेच्या ऊर्जा विभागाची एक संस्था द नॅशनल न्यूक्लियर सिक्युरिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एनएनएसए) येथे अण्वस्त्र तयार करते. सध्याची अण्वस्त्रे खूप जुनी झाली असून त्यांना बदलण्याची गरज आहे असे या संस्थेला वाटते. नवे तंत्रज्ञान खूप सुरक्षित आहे त्यामुळे लोकांनी काळजी करण्याची गरज नाही असेएनएनएसएला वाटते. कारखाना पुन्हा सुरू झाल्यास आपण रेडिएशनच्या तावडीत येऊ अशी लोकांना भीती वाटते.

ओबामा सरकारच्या कार्यकाळात अमेरिकी काँग्रेस व स्वत: राष्ट्रपती ओबामा यांनी येथे अण्वस्त्र निर्मितीसाठी संमती दिली होती. 2018 मध्ये राष्ट्रपती ट्रम्प यांनी या योजनेला मंजुरी दिली हेाती. त्याअंतर्गत एकूण 80 खड्डे दरवर्षी तयार केले जातील. यातील 50 दक्षिण कॅरोलिनात आणि 30 न्यू मेक्सिकोत असतील. येथे प्लुटोनियमचे फूटबॉलसारखे गोल बनवले जातील जे अण्वस्त्रात ट्रिगरचे काम करतील.

दरम्यान, सुरक्षेसंबंधातील तज्ञ स्टीफन यंग यांचे म्हणाले, ही योजना केवळ खर्चिकच नव्हे तर धोकादायकही आहे. कारखान्याजवळ राहणारे 70 वर्षांचे पिट लाबर्ज यांचे म्हणाले, नवे तंत्रज्ञान सुरक्षित असल्याचा अद्याप पुरावा नाही तर एनएनएसएचे म्हणणे आहे, अमेरिका काम थांबवणार नाही, कामात उशीर झाल्यास सुरक्षा धोक्यात येईल तसेच उत्पादन खर्चही वाढेल.

अमेरिकेकडे आहेत 7550 अण्वस्त्रे

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडे 7550 अण्वस्त्र आहेत त्यापैकी 1750 अणुबॉम्ब क्षेपणास्त्र आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com