
नवी दिल्ली | New Delhi
गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये (Manipur) हिंसाचाराच्या घटना घडत असल्याने तेथील जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशातच आता मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात (Thoubal District) ४ मे २०२३ रोजी माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली असून जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करत रस्त्यावर (Road) फिरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये एका जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करत रस्त्यावरून फिरवले. त्यानंतर त्यांचा भर रस्त्यात विनयभंग देखील केला. यानंतर या दोन महिलांना शेतात नेऊन तिथे त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे. तसेच या घटनेनंतर पोलिसांनी (Police) अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना (Accused) अटक झालेली नाही. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचे सांगितले.
त्यानंतर आता या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'माझं मन दुःख आणि रागाने भरले आहे. मणिपूरची जी घटना समोर आली ती कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद घटना आहे. हे पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे बाजूला ठेवा. मात्र, या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावली आहे. मी देशवासीयांना विश्वास देऊ इच्छितो की, कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. कायदा आपल्या पूर्ण शक्तीनिशी आणि कठोरपणे पावले उचलेल. मणिपूरच्या मुलींबरोबर जे झालं ते कधीही माफ केलं जाऊ शकत नाही,' असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला आराजकतेच्या दरीत ढकलले आहे. मणिपूरमध्ये भारतीय विचारांवर हल्ला होत असताना INDIA (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स) शांत राहणार नाही. आम्ही मणिपूरच्या जनतेसोबत आहोत. शांतता हाच आता पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. असे त्यांनी म्हटले आहे.