मुंबई l Mumbai

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि ट्विटर विविध मुद्द्यांवरून आमने-सामने येत आहेत. दरम्यान, काही ट्विटर खात्यांवरून भारतातील शेतकरी आंदोलनाविषयी बदनामाची मोहीम राबवली जात आहे. त्यातून भारताच्या सार्वजनिक शांततेला धोका पोहचत आहे, असे केंद्र सरकारने म्हंटले होते.

द्वेष पसरवणारी ठाराविक ट्विटर अकाउंट्स बंद करण्याचे केंद्र सरकारने निर्देश दिल्यानंतरही त्यावर कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ट्विटर इंडियाला सरकारने झटका दिला. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देताच ट्विटरने आपल्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे. त्यानुसार, ट्विटर इंडियाने ७०९ अकाऊंट्स बंद केले आहे.

केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरने जी ७०९ अकाउंट्स बंद केली आहेत. त्यामध्ये १२६ अकाउंट्समधील मजकुरात #ModiPlanningFarmerGenocide तर ५८३ अकाउंट्स हे खलिस्तानी आणि पाकिस्तानशी संबंधित आहेत. या अकाउंट्सद्वारे दिशाभूल करणारी माहिती आणि चिथावणीखोर मजकूर असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाबाबत चिथावणीखोर पोस्ट टाकल्याप्रकरणी काही अकाऊंट्स काढून टाकण्याचे आदेश भारत सरकारने ट्विटरला दिले होते. या आदेशाबाबत आता ट्विटरने भारत सरकारला उत्तर सादर करत म्हंटले होते की, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य असुन केंद्र सरकारसोबत चर्चेची तयारीही दर्शविली आहे. भारत सरकारकजून नॉन-कंप्लायंस नोटिस प्राप्त झाली असून आम्ही भारत सरकारशी संपर्कात आहोत, असे ट्विटरच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले होते. आमच्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच माहितीच्या देवाणघेवाणीचा जागतिक सकारात्मक स्तरावर परिणाम होतो, यावर आमचा ठाम विश्वास आहे. तसेच ट्विट्स प्रवाहही सुरु राहिला पाहिजे. अशा तक्रारींबाबत आम्ही ती योग्य ती कारवाई करतो. मात्र त्याबरोरच सार्वजनिक संभाषण आणि मूलभूत तत्त्वांच्या सुरक्षेबाबत वचनबद्धता कायम राहिल हे ही सुनिश्चित करतो, असे कंपनीने स्पष्ट केले होते. मुक्त अभिव्यक्तीच्या आमच्या मूलभूत तत्त्वांचे रक्षण करत असताना स्थानिक कायद्यांचा आदर करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. ट्विटरवर चुकीच्या माहितीबद्दल आमच्याकडे कोणी तक्रार केली, तर यासंदर्भात ट्विटरचे नियम आणि स्थानिक कायदा यांची पडताळणी केली जाईल. मजकुराने ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केले गेले असेल, तर तो मजकूर काढून टाकला जाईल, अशी माहिती ट्विटरच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली होती.