
दिल्ली | Delhi
तुर्की आणि सिरीयामध्ये ६ फेब्रुवारीला सकाळी विनाशकारी भूकंप झाला. आतापर्यंत या भूकंपात २४ हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर २० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. अजूनही हजारो लोक बेपत्ता आहे.
जगभरातील देशांनी याठिकाणी आपापले सैन्य पाठवून बचावकार्याला सुरुवात केली आहे. अशातच, एका बचाव मोहिमेदरम्यान कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून १२८ तासानंतर एका नवजात बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर लोक या घटनेला चमत्कार असल्याचे म्हणत आहेत.
तुर्कीतील हाताय येथे शनिवारी ढिगाऱ्याखालून दोन महिन्यांच्या बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. मृत्यूवर मात केलेल्या या चिमुकल्यासाठी जमावानं टाळ्या वाजवल्या. या चिमुकल्याला वाचवल्याचा आनंद मदत आणि बचाव पथकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. भूकंपानंतर सुमारे १२८ तासांनी हे बाळ सुखरुप सापडलं आहे.
तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांनी मदतीची विनंती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याची घटना समोर आली आहे. लोकेशन शेअर करून आपला जीव वाचवण्याचे आवाहन केले. त्यामुळे अनेकांचा शोध घेता आला आणि अनेकांचे प्राण वाचवण्यात बचाव कर्मचार्यांना यश आले.
अशाच प्रकारे एका विद्यार्थ्याने Whatsapp चा वापर केला, त्यानंतर त्याला आणि त्याच्या आईला वाचवण्यात यश आले आहे. बोरान कुबत असं या २० वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून त्याने Whatsapp व्हिडीओ अपीलमध्ये त्याचे लोकेशन शेअर केले होते, त्यानंतर तुर्कीमधील एका अपार्टमेंटच्या ढिगाऱ्याखालून त्याला वाचवण्यात यश आले.
दरम्यान भूकंपातून (Earthquake) अनेक जण बचावले आहेत. पण बचावलेल्यांसमोर आता अन्नसंकट आहे. भूक आणि थंडींमुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. भूकंपामध्ये अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या. अनेक जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.
आता भागात अन्नाचं संकटही निर्माण झालं आहे. अनेक लोकांचा ढिगाऱ्याखाली अडकून भूक आणि थंडीमुळे मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव पथकांसमोर मोठं आव्हान आहे. दरम्यान, भारतीय NDRF आणि तुर्की प्रशासनाकडून मदत आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
एका भारतीय नागरिकाचा मृत्यू
तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात उत्तराखंडच्या पौरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले विजय कुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. ते एका कामानिमित्त तुर्कीला गेले होते. यावेळी त्यांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. भूकंप झाल्यानंतर हॉटेलची इमारत ढासळली. यामध्ये विजय कुमार यांचा मृत्यू झाला. बचाव पथकांना त्यांचा मृतदेह मिळाला तेव्हा त्यांचा चेहरा पूर्णपणे चिरडला गेला होता. मात्र, त्यांच्या हातावरील 'ओम'च्या टॅटूने त्यांनी ओळख पटवण्यात आली.