दिल्ली । Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 'लीजन ऑफ मेरीट' (Legion of Merit) अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. भारत आणि अमेरिकेतील भागिदारी आणि व्यवहार्यपूर्ण संबंधातील वद्धीसाठी केलेल्या नेतृत्वामुळे मोदींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट सी. ओ. ब्रायन यांनी ही माहिती दिली. अमेरिकेमध्ये तैनात असणारे भारतीय राजदूत तरनजीत सिंह संधू यांनी पंतप्रधान मोदींच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी आपल्या ट्विटरमध्ये लिहिलंय की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लीजन ऑफ मेरीट पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. मोदींनी भारत देशाची जागतिक स्तरावर वेगळीच प्रतिमा तयार केलीय. तसेच, अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांतील संबंध मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे करण्यात मोदींच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच, यंदा हा पुरस्कार नरेंद्र मोदींना देण्यात येत असल्याचंही रॉबर्ट यांनी म्हटलंय.

२० जुलै १९४२ रोजी अमेरिकन काँग्रेसने लीजन ऑफ मेरिट मेडल देण्यास सुरुवात केली. हा पुरस्कार अमेरिकन लष्कर आणि परदेशातील लष्कराच्या सदस्यांना तसेच राजकीय व्यक्तींना प्रदान करण्यात येतो. असाधारण कामगिरी करणाऱ्यांना हा सन्मान दिला जातो. अमेरिकेकडून परदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी हा एक पुरस्कार आहे.

हा पुरस्कार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा आणि जागतिक स्तरावर भारत हा नवीन शक्ती म्हणून पुढे येत आहे या गोष्टीला मिळणाऱ्या पाठींब्याचे प्रतिक आहे. तसेच हा पुरस्कार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि अमेरिकेमधील राजकीय संबंध सुधारले असून जागतिक शांतता आणि समृद्धीला पाठिंबा देण्यासाठी दोन्ही देशांनी काम केल्याचं प्रतिक आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

अमेरिकेतील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असणारा लीजन ऑफ मेरिट पुरस्कार मिळवण्याआधी मोदींना २०१६ साली सौदी अरेबियाने ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सऊद, अवॉर्ड ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान (२०१६), फिलिस्तीन अवॉर्ड २०१८, संयुक्त अरब अमिरातीचा ऑर्डर ऑफ जायद अवॉर्ड (२०१९), रशियाचा ऑर्डर सेंट अॅड्र्यू (२०१९) असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.