टोलनाक्यांसंदर्भात नितीन गडकरींची मोठी घोषणा

नितीन गडकरी
नितीन गडकरी

दिल्ली | Delhi

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी संसदेत देशभरातील टोलनाक्यांसंदर्भात मोठी घोषणा केली.

सरकार पुढील वर्षभरात टोलनाके हटवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचं त्यांनी संसदेत सांगितलं. येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीनं टोल तेवढाच द्यावा लागेल जेवढं त्यांचं वाहन रस्त्यांवर चालेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच जुन्या गाड्यांमध्ये मोफत GPS सुविधा लावून देऊ, असंही त्यांनी म्हटलंय. यावेळी, देशात सुरू असलेल्या काही महामार्गांच्या कामकाजाची माहितीही गडकरींनी सभागृहाला दिली.

लोकसभेत उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी महापालिकेच्या टोलचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गडकरींनी ही माहिती दिली. मागील सरकारकडे बोट दाखवत, टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे छोटे टोल उभारण्यात आल्याचे गडकरींनी म्हटले. शहरांच्या सीमांवर असे टोल असणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, टोल नाका संपुष्टात आणण्याच्या योजनेत तुम्ही महामार्गावर जिथून चढाल तिथे जीपीएसच्या मदतीनं सीसीटीव्ही कॅमेरा तुमचा एक फोटो घेईल. तसंच जिथे महामार्गावरू बाहेर पडाल तिथेही एक फोटो घेतला जाईल. तुम्ही जेवढा प्रवास केला असेल तेवढ्याच अंतराचा टोल तुम्हाला भरावा लागेल' असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलंय.

गडकरीनी GPS प्रणालीबद्दल माहिती देताना सांगितले की, रशियन सरकारच्या मदतीने २ वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त होणार असून ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जीपीएसला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. जीपीएस प्रणालीमुळे टोल थेट बँक खात्यातून वजा होणार आहे. वाहनांच्या हालचालीच्या आधारे टोल वसूल करण्यात येईल. तंत्रज्ञानामुळे पारदर्शक व्यवहार, कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यात येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com