दिल्ली l Delhi

देशात करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली असून पुन्हा करोना रूग्णांची वाढ ही आता चिंतेची बाब होत चालली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या २४ तासांत नवीन १३,१९३ रुग्ण आढळले असून १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० हजार ३०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ०९ लाख ७७ हजार ३८७ इतकी झाली असून आतापर्यंत १ कोटी ०६ लाख ७८ हजार ७४१ रुग्ण पूर्ण बरे झाले. देशात सद्य स्थितीत १ लाख ४३ हजार १२७ रुग्नांवर उपचार सुरु असून आतापर्यंत १ लाख ५६ हजार २१२ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये शुक्रवारी करोनाचे ६ हजार ११२ नवे करोना रुग्ण आढळून आले. राज्यातील करोनामुक्त रुग्णांची शुक्रवारची संख्या दोन हजार १५९ इतकी होती. तर करोनामुळे देशभरात मरण पावलेल्या १०१ रुग्णांपैकी ४४ महाराष्ट्रातील होते. महाराष्ट्रामध्ये करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० लाख ८७ हजार ६३२ इतकी झाली आहे. यापैकी १९ लाख ८९ हजार ९६३ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्यामध्ये करोनाचा संसर्ग झाल्याने मरण पावलेल्यांची संख्या ५१ हजार ७१३ वर पोहचली आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या रुग्णालयांबरोबरच करोना सेंटर्समध्ये ४४ हजार ७६५ जण उपचार घेत आहेत.

अजित पवार यांनी पुन्हा लॉकडाऊनचे दिले संकेत

राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. १ फेब्रुवारीपासून नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याबाबत माहिती देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती, यवतमाळ, अकोला या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी राज्यातील करोना परिस्थीतीबाबत भाष्य केलं आहे. राज्यात गेले काही दिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई, पुणे या शहरांच्या तुलनेत इतर जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग अधिक फैलावत असल्याचं निदर्शनास आलं आहे. विशेषत: ग्रामीण भागात करोना रुग्णवाढ दिसून येत आहे. त्यावर बोट ठेवत अजित पवार यांनी पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहे.

तसेच बृहन्मुंबई महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली असून होम क्वाॅरंटाइन, विवाह तसेच सार्वजनिक समारंभांसाठी जाहीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.