एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात; करोनाच्या संकटात UNICEF ने व्यक्त केली भीती

युनिसेफने १४० देशांमध्ये केली पाहणी
एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात; करोनाच्या संकटात UNICEF ने व्यक्त केली भीती

मुंबई | Mumbai

करोनाचे संकट पुढील वर्षीही कायम राहणार असून यामुळे एका संपूर्ण पिढीचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी शक्यता युनिसेफने व्यक्त केली आहे. या महासाथीत जगभरात तब्बल २० लाख बालकांचा मृत्यू होऊ शकतो तसेच करोनाचा प्रभाव कायम राहिल्यास एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात येईल, असा इशारा युनिसेफने दिला आहे

यासाठी युनिसेफने १४० देशांमध्ये पाहणी केली. या संशोधनानुसार सध्याच्या पिढीसमोर ३ प्रकारचे धोके दिसून आले आहेत. यामध्ये करोनाचा परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरीबी याशिवाय विषमतेचा समावेश करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नियमित लसीकरण होत नाही. याबाबत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. जर या आरोग्य सुविधा नियमित दिल्या गेल्या नाही तर २० लाख मुलांचा पुढील १२ महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे. दुसरीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तरुण पिढीची काम करण्याची क्षमताही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जगातील एकतृतीयांश देशामधील आरोग्य सेवांमध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे. संसर्गाची भीतीमुळे ही घट झाली असून, नियमित लसीकरण, बाह्यरुग्णांची केली जाणारी देखभाल, लहान मुलांना होणारा संसर्ग, गर्भवती महिलांसाठीची आरोग्य सेवा यावर याचा परिणाम झाला असल्याचं युनिसेफनं म्हटलं आहे. ६५ देशांमध्ये घरोघरी जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटींमध्येही मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com