देशाचा करोना रिकव्हरी रेट 87.76 टक्के

आरोग्य मंत्रालयाची माहिती
देशाचा करोना रिकव्हरी रेट 87.76 टक्के

नवी दिल्ली - देशातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 87.76 टक्के इतके झाले आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

देशात 24 तासांत 2.57 लाख नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या 20 दिवसांची आकडेवारी पाहिली तर करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. 3 मे रोजी देशात 17.13 टक्के रुग्ण होते. आता हा आकडा 11.12 टक्क्यांवर आला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 30 लाखांहून अधिक जण बरे झाले आहेत. तर मागच्या 24 तासांत 4 हजार 194 जणांचा करोनामुळे जीव गेला आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्लीत सर्वाधिक करोनाने मृत्यू झाल्याचेही सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे.

देशातील 8 राज्यात 1 लाखाहून अधिक सक्रिय करोना रुग्ण आहेत. 8 राज्यांमध्ये 50 हजार ते 1 लाखादरम्यान करोना रुग्ण सक्रीय आहेत. तर 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 50 हजारांहून कमी रुग्ण असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. देशातील 78 टक्के नवे रुग्ण हे 10 राज्यांमध्ये आहेत. त्यापैकी 7 राज्यात प्रतिदिन 10 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

18 राज्यामध्ये करोनाबाधितांची टक्केवारी 15 टक्के आहे. तर 14 राज्यांमध्ये करोनाबाधितांची टक्केवारी 5 ते 15 टक्क्यांदरम्यान आहे. तर 4 राज्यांमध्ये करोना बाधितांची टक्केवारी 5 टक्क्यांच्या खाली आहे.

देशात आतापर्यंत 45 वर्षांवरील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचार्‍यांना 18.41 कोटी लशींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. तर 18 ते 44 वयोगटातील 92 लाखांच्या आसपास लशींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत असेही लव अग्रवाल यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com