गावांना आत्मनिर्भर बनवण्यावर भर - पंतप्रधान

करोनापासून गावांना वाचवा
गावांना आत्मनिर्भर बनवण्यावर भर -  पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - देशातल्या गावांना पूर्णतः आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंचायत राज दिनानिमित्ताने शनिवारी ऑनलाईन पद्धतीने झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. या कार्यक्रमात आठ राज्यांमधील मुख्यमंत्री सहभागी झाले होते.

पंतप्रधान म्हणाले, देशभरातल्या ग्राम पंचायतींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुमारे 2 लाख 25 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ग्रामीण भारताच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामांमध्ये अधिक पारदर्शकता यावी यासाठी ई-ग्राम स्वराज उपक्रमावर अधिक भर दिला जात आहे. ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर भू-जल, स्वच्छता, कृषी तसेच शिक्षणासंबंधीचे उपक्रम राबवावेत असं आवाहनही त्यांनी केलं.

यावेळी प्रधानमंत्र्यांनी स्वामीत्व योजनेच्या संपूर्ण देशभरातल्या अंमलबजावणीलाही सुरुवात केली. या योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड मिळालेले नागरिकांना बँका आणि वित्तीय संस्थांमधून कर्ज मिळवणं अधिक सुलभ होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं. यावेळी चार लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या ई-मालमत्ता कार्डाचं वाटपही ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आले.

करोनापासून गावांना वाचवा

मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची करोना लाट भयंकर आहे. शहरांमध्ये प्रचंड थैमान घालत असलेल्या करोनापासून खेडेगावांना वाचविण्याची आवश्यकता आहे. गावांच्या वेशीवरच या महामारीला थोपविण्यासाठी आवश्यक ती पावले तातडीने उचलण्याची गरज आहे, असेही तप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मागील वर्षी आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे करोनापासून गावांचे रक्षण केले होते. करोनाच्या व्यवस्थापनासंदर्भात आता स्थानिक प्रशासन अधिक अनुभवी झाले असल्याने, यावर्षीच्या लाटेपासूनही गावांचे रक्षण करण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या आभासी कार्यक्रमात आठ राज्यांमधील मुख्यमंत्री सहभागी झाले होते. देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधीही आभासी माध्यमातून जुळले होते.

करोनाच्या या भीषण महामारीवर जर कुणी सर्वप्रथम विजय प्राप्त करू शकेल, तर ती खेडेगावांमधील जनताच आहे. गावांचे नेतृत्व आणि तेथील नागरिक करोनाला त्यांच्या वेशीवरच थोपवून धरणार आहे आणि हेच लोक देशाला व जगाला करोनाविरोधी लढण्याचा मार्गही दाखवतील, असे पंतप्रधान म्हणाले. तुम्ही या लढ्यात यशस्वी व्हाल, याविषयी माझ्या मनात काहीच शंका नाही. मात्र, याचा अर्थ आपण बेफिकीर राहावे, असा मुळीच होत नाही. करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घ्यायलाच हव्या आणि सोबतच सोशल डिस्टंन्सिंग, स्वच्छता आणि मास्क यासारख्या नियमांचेही तितक्याच काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे असेही मोदी म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com