
अंकारा | Ankara
तुर्कीची राजधानी अंकारा येथे पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी येथे संसदेच्या जवळ मोठा स्फोट झाला आहे. संसदेजवळ एका आत्मघाती हल्लेखोराने रविवारी स्फोट केला, तर दुसरा हल्लेखोर पोलिसांशी झालेल्या गोळीबारात ठार झाला. या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारी किंचित जखमी झाले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होण्याच्या काही तास आधी हा हल्ला झाला.
रविवारी अंकारा येथील तुर्की संसदेजवळ दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये दोन पोलीस अधिकारी जखमी झाले. दोन हल्लेखोर एका व्यावसायिक वाहनातून सकाळी 9.30 वाजता गृह मंत्रालयाच्या सुरक्षा महासंचालनालयाच्या गेटसमोर आले आणि त्यांनी आत्मघाती बॉम्ब हल्ला केला. यावेळी एका दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवले आणि दुसरा पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात ठार झाला.
या परिसरात गोळीबाराचा आवाजही ऐकू आल्याचे वृत्त आहे. सध्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल होत आहेत. विशेष म्हणजे संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच ही घटना घडली.
ज्या ठिकाणी आत्मघाती हल्ला झाला त्या ठिकाणी संशयित बॅगा आणि पॅकेजेस आढळून आले आहेत. बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी आलं असून ते हे बॉम्ब निकामी करण्याचं काम करत आहे. अतिरेकी हल्ल्यानंतर या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहे. पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळी मेडिकलची टीम दाखल झाली असून या हल्ल्यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
अल जझीराच्या वृत्तानुसार, तुर्कस्तानमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आजपासून संसद सुरू होत आहे. संसद भवन आणि गृह मंत्रालयाच्या इमारतीजवळ ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणाभोवती सुरक्षा कडक करण्यात आली आहे.