Air India ची मालकी पुन्हा TATA कडे; सरकारची अधिकृत घोषणा

Air India ची मालकी पुन्हा TATA कडे; सरकारची अधिकृत घोषणा
File Photo : Air India

दिल्ली | Delhi

देशातील सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (TATA Sons won Air India Final Bid) आता टाटा समूहाची झाली आहे. आज अधिकृतपणे टाटांनी एअर इंडियासाठी लावलेली बोली जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

टाटा सन्सने एअर इंडियासाठी १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. तर दुसरे खरेदीदार असलेल्या अजय सिंह यांच्या स्पाईसजेटने एअर इंडियासाठी १५ हजार १०० कोटी रुपयांची बोली लावली होती. या दोन्ही खरेदीदारांच्या बोली अंतिम फेरीसाठी पात्र असल्याचं एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिस्तरीय समितीने जाहीर केलं होतं.

कर्जाच्या बोज्याखाली अडकलेल्या एअर इंडियाला विक्रीसाठी सुरू करण्यात आलेली बोली प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. तसंच यावेळी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Aviation Minister Jyotiraditya Scindia) यांनी यापूर्वी तारीख बदलली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. सरकारनं यापूर्वी २०१८ मध्ये एअर इंडियातील (Air India) ७६ टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली होती. परंतु त्यावेळी सरकारला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर सरकारनं कंपनीच्या पूर्णपणे विक्रीचा निर्णय घेतला.

अंतिम तारखेपर्यंत म्हणजेच १५ सप्टेंबरपर्यंत दोन संभाव्य खरेदीदारांनी आपल्या निविदा (financial bids) दाखल केल्या होत्या. टाटा समुहाद्वारे (TATA Group) आपली होल्डिंग कंपनी आणि स्पाईसजेटचे चेअरमन अजय सिंह आणि अन्य काही जणांनी आपली बोली सादर केली होती. सरकारनं एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली होती. परंतु कोरोना महासाथीमुळे यामध्ये विलंब होत गेला. एप्रिल २०२१ मध्ये सरकारनं पुन्हा एकदा बोली प्रक्रिया सुरू केली. तसंच १५ सप्टेंबर ही यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. २०२० मध्ये टाटा समुहानंदेखील एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी उत्सुक असल्याचं पत्र दिलं होतं.

Related Stories

No stories found.