Rafale Deal : सर्वोच्च न्यायालयत दाखल 'त्या' याचिकेवर दोन आठवड्याने होणार सुनावणी

Rafale Deal : सर्वोच्च न्यायालयत दाखल 'त्या' याचिकेवर दोन आठवड्याने होणार सुनावणी
दसॉल्ट राफेल/Dassault Rafale

दिल्ली | Delhi

राफेल विमानांच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे आरोप अनेक वर्षांपासून केले जात आहेत.

त्यातच काही दिवसांपूर्वी एका फ्रेंच संस्थेने केलेल्या आरोपांची भर पडली आहे. या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता दोन आठवड्याने सुनावणी होणार आहे.

या याचिकेत 'राफेल व्यवहाराची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी तसेच राफेल व्यवहार रद्द करून दंडासह सर्व रक्कम वसूल करण्यात यावी', अशी मागणी करण्यात आली होती. राफेल करारामध्ये डसॉल्टने एका भारतीय मध्यस्थाला सुमारे १० लाख युरो दिल्याचा खळबळजनक दावा एका वृत्तसंस्थेने वृत्तात केला होता. त्यामुळे या मुद्द्यावरू न पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती.

मात्र, हे सर्व आरोप डसॉल्टने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. सरकारी अधिकारी, फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था यांनी मिळून या कराराचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा घोटाळा झाल्याचं सापडलेलं नाही. भारताला ३६ राफेल विमानं देण्यासंदर्भातल्या करारात कोणताही गैरप्रकार झालेला नाही, असं डसॉल्टकडून सांगण्यात आलं आहे.

तसेच, २००० सालापासूनच डसॉल्टने भ्रष्टाचार, नैतिक तत्व, बाजारातली आपली पत राखण्यासाठी अंतर्गत प्रक्रिया सुरू केली आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंटचे सर्व नियम आणि करार आम्ही पाळतो, असं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

ज्या मध्यस्थाला ही रक्कम देण्यात आली आहे, त्याचं नाव सुशेन गुप्ता असं सांगितलं जात आहे. या व्यक्तीची आधीच ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. डसॉल्टच्या २०१७च्या वार्षिक अहवालाची तपासणी केली जात असताना हा प्रकार समोर आल्याचं देखील त्या वृत्तात म्हटलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com