विरोधी पक्षांना 'सर्वोच्च' दणका; ‘ती’ याचिका फेटाळली!
दिल्ली | Delhi
ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांच्या गैरवापराविरोधातील १४ विरोधी पक्षांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
राजकारण्यांसाठी वेगळी मार्गदर्शक तत्त्वे तयार करता येणार नाहीत, असे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील बेंचने सुनावल्याने विरोधी पक्षांच्या वकिलांनी ही याचिका माघारी घेतली आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी ही याचिका दाखल केली होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांना सातत्याने लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस, आप, डीएमके, आरजेडी, बीआरएस, टीएमसी यांच्यासह १४ राजकीय पक्षांचा यामध्ये समावेश आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. पर्दीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेमध्ये प्रामुख्याने ईडी आणि सीबीआयला लक्ष्य करण्यात आलं होतं.
यावेळी न्यायालयाने याचिका फेटाळताना विरोधी पक्षांना सुनावलं. “कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय आम्ही आदेश देऊ शकणार नाही. न्यायालयानं असं केल्यास ते कदाचित धोकादायक ठरू शकेल”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.