दिल्ली | Delhi

करोना संसर्गामुळे देशातील अनेक राज्यातील अंगणवाडी केंद्रे बंद होती. मात्र, आता राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कंटमेंट झोन वगळता देशभरातील अंगणवाडी सेवा पुन्हा सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाने राज्यांना ३१ जानेवारीपर्यंत अंगणवाडी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यास सांगितलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशातील अनेक राज्यातील अंगणवाडी केंद्रे बंद होती. कोरोनामुळे १४ लाख अंगणवाड्या बंद करण्याचा मुद्दा याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला होता. या याचिकेत मुलांना व मातांना पौष्टिक आहार न मिळण्याने त्रास होत असल्याचं म्हटलं होतं. अंगणवाडी केंद्रांमार्फत शून्य ते सहा वर्षे व गर्भवती महिलांना पौष्टिक आहारा पुरवला जातो.

आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील अनेक गर्भवती महिलांना योग्य आहार मिळत नसल्यामुळे जन्माला आलेले बाळ कुपोषित होण्याची शक्यता असते. म्हणून गर्भवती मातांची नोंद घेण्यासह त्यांना पौष्टिक आहार पुरविण्याची जबाबदारी सरकारने अंगणवाडी सेविकांवर सोपवली आहे. पण कोरोनाच्या साथीमुळे मार्च २०२० पासून देशातील सर्व अंगणवाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक लहान मुले आणि गर्भवती महिला पौष्टिक आहारापासून वंचित राहिल्या.