राजधानीला भूकंपाचे धक्के; नेपाळसह उत्तर भारतात ४.६ आणि ६.२ रिश्टर स्केलचे दोन जोरदार धक्के

राजधानीला भूकंपाचे धक्के; नेपाळसह उत्तर भारतात ४.६ आणि ६.२ रिश्टर स्केलचे दोन जोरदार धक्के

नवी दिल्ली | New Delhi

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील मोठ्या भागात भूकंपाचे (Earthquake Tremors Felt In Delhi NCR) धक्के जाणवले आहेत. सुमारे एक मिनिट भूकंपाचे धक्के जाणवत होते आणि इमारती देखील हादरत राहिल्या. यावेळी घाबरुन लोक घरातून आणि ऑफिसमधून बाहेर पडले. राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल होती.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा पहिला हादरा दुपारी २.२५ वाजता जाणवला, त्याची तीव्रता ४.६ इतकी होती आणि भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये पृथ्वीच्या १० किमी खोल होता.

अर्ध्या तासाच्या आत दुसरा भूकंप झाला, ज्याची तीव्रता ६.२ होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून ५ किलोमीटर खोलीवर होता, त्यामुळे त्याचे धक्के खूप वेगाने आणि दूरवर जाणवले.

सर्वसाधारणपणे ४.६ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप हा धोकादायक मानला जातो. राजधानी नवी दिल्लीसह या भूकंपाचे धक्के हरियाणा, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमध्ये देखील जाणवला. या भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशच्या लखनऊ, कानपूर, श्रावस्ती, बरेली, मुरादाबाद, मेरठ आणि गाझियाबाद सारख्या शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.नवी दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि एनसीआरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com