Srinivasa Ramanujan Death Anniversary : '१७२९' या संख्येला 'हार्डी-रामानुजन' संख्या का म्हणतात?, जाणून घ्या

Srinivasa Ramanujan Death Anniversary : '१७२९' या संख्येला 'हार्डी-रामानुजन' संख्या का म्हणतात?, जाणून घ्या
श्रीनिवास रामानुजन/जी.एच. हार्डी

भारतीय गणितज्ञ रामानुजन यांच्या त्या वहीतील अनेक सूत्रे आजही नव्या संशोधनाची दिशा स्पष्ट करत आहे. अवघे ३३ वर्षे जीवन लाभलेले रामानुजन विज्ञान जगतासाठी लाभलेले अलौकिक गणिती होते. रामानुजन यांचा मेंदू बहुधा झोपेतही गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत. अशाच एका घटनेवरून '१७२९' या संख्येला 'हार्डी-रामानुजन' संख्या म्हंटले जाते.. जाणून घेऊयात 'हार्डी-रामानुजन' संख्येमागील इतिहास काय..

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म त्या वेळच्या मद्रासमधील तंजावर जिल्ह्यातील एरोड येथे गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.

त्यांनी प्रारंभी स्वतःच त्रिकोणमितीचा अभ्यास केला व वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लेनर्ड ऑयलर (१७०७-८३) यांनी पूर्वसूचित केलेली ज्या व कोज्या यांसंबंधीची प्रमेये मांडली. रामानुजन यांना गणिताचं इतकं वेड होतं की ते गणित सोडून इतर विषयाचा अभ्यास नीट करत नसत. परिणामी अकरावीला एकदा आणि बारावीला दोन वेळा ते नापास झाले.

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त २३ वर्ष होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला.

प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले.

इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली. रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी.एच . हार्डी एका मोटारीतून गेले, त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९. हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितले. तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी 'नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.' असं सांगितलं. तेव्हापासून १७२९ या संख्येला हार्डी-रामानुजन संख्या म्हटले जाते. (१७२९ ही १७२८ नंतरची आणि १७३० च्या अगोदरची नैसर्गिक संख्या आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.)

१९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.

१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी एप्रिल २६, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. अखेरपर्यंत ते गणितातील संशोधनात मग्न होते. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com