
नवी दिल्ली | New Delhi
ऐन दिवाळीच्या (Diwali) सणामध्ये हैदराबाद (Hyderabad) येथील एका केमिकल गोदामाला आग (Chemical Godown Fire) लागून ०२ महिलांसह ०६ जणांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण होती की, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला...
याबाबत सेंट्रल झोनचे डीसीपी व्यंकटेश्वर राव (DCP Venkateswara Rao) यांनी माहिती देताना सांगितले की, हैदराबाद येथील बाजारघाट, नामपल्ली येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या गोदामाला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामध्ये ०२ महिला आणि ०४ पुरुषांचा समावेश आहे. तर १६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव (CM KC Rao) यांनी नामपल्ली येथील आगीत मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) तीन गाड्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले. तर डीजी (अग्निशमन सेवा) नागी रेड्डी यांनी सांगितले की, "इमारतीमध्ये केमिकल्सचा बेकायदेशीररीत्या साठा करण्यात आला असावा. इमारतीच्या स्टिल्ट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा साठा करण्यात आला होता आणि याच केमिकल्समुळे आग लागली होती. या भीषण आगीतून एकूण २१ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी ०६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ०६ जणांवर उपचार सुरू असून सर्व लोकांना अपार्टमेंटमधून बाहेर काढण्यात आले आहे.