आसाम-मेघालय बॉर्डरवर हिंसाचार: गोळीबारात ६ जणांचा मृत्यू, ७ जिल्ह्यात इंटरनेट बंद

आसाम-मेघालय बॉर्डरवर हिंसाचार: गोळीबारात ६ जणांचा मृत्यू, ७ जिल्ह्यात इंटरनेट बंद

दिल्ली | Delhi

आसाम-मेघालय सीमेवर मंगळवारी (२२नोव्हेंबर) सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मेघालय सरकारने ७ जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा पुढील ४८ तासांसाठी बंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसाम वन विभागाकडून मेघालय सीमेवर गस्त घालण्यात येत होती. मध्यरात्री ३ वाजता अवैधरित्या लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रक न थांबता पुढं गेल्यानं आसामच्या वनरक्षकांनी ट्रकच्या चाकांवर गोळीबार केला. यात तीन जणांना अटक करण्यात आलं. तर, काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

वनविभागानं जिरिकेंडिंग ठाण्यात या संदर्भात माहिती देत अतिरिक्त कुमूक मागवली. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी मेघालायातील लोक शस्त्रांसह त्या ठिकाणी पोहोचले होते. त्यांनी अटक करण्यात आलेल्या लोकांना सोडण्याची मागणी केली आणि पोलिसांनी घेराव घातला. यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार केला यात ६ जणांचा मृत्यू झाला.

प्रशासनाने खबरदारी म्हणून मेघालयच्या ७ जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या प्रकरणी मेघालय पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com