
दिल्ली l Delhi
बोको हराम (Boko Haram) या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा नायजेरियात (Nigeria) नरसंहार सुरू केला आहे. कट्टर इस्लामिक संस्था बोको हरामच्या सदस्यांनी तब्बल ११० शेतकऱ्यांची निर्घृण हत्या केल्याची माहिती यूएनने (UN) दिली आहे.
बोको हरमच्या दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने केलेल्या या हल्ल्यामध्ये सर्व पुरुषांची गळा चिरुन हत्या करण्यात आली. त्यानंतर या दहशतवाद्यांनी काही महिलांना पळवून नेलं.
नायजेरियामधील संयुक्त राष्ट्रांचे समन्वयक एडवर्ड कल्लोन म्हणाले की, "सुरुवातीला मृतांची संख्या ४३ होती, जी नंतर वाढून ७० झाली. शेवटी ११० लोकांची हत्या झाल्याचे समोर आले. ही घटना सामान्य नागरिकांवर अत्यंत हिंसक मार्गाने झालेला थेट हल्ला आहे. या हत्यारांना कोर्टात उभे केले पाहिजे." तसेच या "प्रकरणाची चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा दिली पाहिजे," असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.
या हल्ल्याचा नायजेरियाचे अध्यक्ष मोहम्मदू बुहारी यांनी निषेध केला आहे. संपूर्ण देश या हत्येमुळे जखमी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. वायव्य नायजेरियातील सोकोतो राज्यामधील कामगारांचा मृतांमध्ये समावेश होता, जे सुमारे 1000 किलोमीटर (600 मैल) दूर होते आणि ते कामाच्या शोधात येथे आले होते. आठ जण या हल्ल्यात बेपत्ता आहेत, जहादींनी त्यांना पळवून नेले आहे. सध्या घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे. जबरमारी गावात सर्व मृतदेह नेण्यात आले आहेत, जिथे त्यांना रविवारी दफन करण्यापूर्वी ठेवले गेले होते. जिहादी वादात 2009 पासून सुमारे 36 हजार लोक मरण पावले आहेत आणि 20 लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.