
गाझियाबाद | Ghaziabad
उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद इथं आज सकाळी जवळपास तीस गाड्या एकमेकांवर आदळल्याची घटना घडली आहे. सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर ही घटना घडली आहे.
दाट धुक्यामुळे समोरील दृष्य न दिसल्याने अनेक गाड्या एकमेकांवर आदळून हा भीषण अपघात झाला. सकाळपासून वातावरण अगदी स्वच्छ असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आठ-साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक धुके पसरले. त्यामुळे मेरठहून गाझियाबादकडे जाणाऱ्या लेनवर वाहने एकमेकांवर आदळली.
या विचित्र अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये एक स्कूलबसही होती. यामधले बरेच विद्यार्थीही जखमी झाले आहेत, त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
दरम्यान, चीनमधील झेंगझोऊ येथेही अशी मोठी दुर्घटना घडली होती. त्यावेळी एका पुलावर सुमारे २०० वाहनं एकमेकांवर आदळली होती. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तो अपघातही दाट धुक्यामुळे झाला.