लसींच्या तुटवड्यासंदर्भातील ‘त्या’ विधानानंतर सीरमची सारवासारव

कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांच्या विधानाशी आमचा संबंध नाही
लसींच्या तुटवड्यासंदर्भातील ‘त्या’ विधानानंतर सीरमची सारवासारव
अदर पुनावाला

नवी दिल्ली - करोना प्रतिबंधक लस देण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली जाणून न घेताच आणि लसीच्या साठ्याबाबत कोणतीही माहिती न घेताच केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली. त्यामुळे लशींचा तुटवडा निर्माण झाला, असा आरोप शुक्रवारी (21 मे) सीरम इन्स्ट्यिूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित एका शिखर परिषदेत बोलताना केला आहे.

यावर आता सीरम इन्स्टिट्यूटच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला 22 मे रोजी पत्र पाठवून हे स्पष्टीकरण दिलं आहे. सीरमकडून कोणत्याही प्रकारचं विधान करण्यात आलेलं नाही. जाधव यांच्या विधानाशी आमचा संबंध नाही. तसेच जाधव यांनी जे सांगितलं तो आमचा विचार नाही. हे मी तुम्हाला सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्यावतीने सांगत आहे, असे सिंह यांनी या पत्रात म्हटले आहे.

कार्यकारी संचालक जाधव नेमके काय म्हणाले?

लसीकरणासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं निर्धारित केलेली नियमावली समोर ठेवून त्यानुसार लोकांचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा होता. सुरूवातीला 300 मिलियन लोकांना लस दिली जाणार होती. त्यासाठी 600 मिलियन डोसची गरज होती. सुरुवातीच्या उद्देशापर्यंत आम्ही पोहोचण्याआधीच 45 वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण करण्याची आणि त्यानंतर 18 ते 44 या वयोगटातील लोकांच्या लसीकरणालाही केंद्र सरकारने परवानगी देऊन टाकली. आपल्याकडे यासाठी लागणार्‍या लशींचा साठा उपलब्ध नसल्याची माहिती असतानाही सरकारने ही परवानगी दिली. यातून आपल्याला हेच शिकायला मिळते की, लशींची उपलब्धता लक्षात घेऊन आणि त्याचं सुसंगत वितरण करायला हवे, असे कार्यकारी संचालक सुरेश जाधव म्हणाले आहेत.

या संकट काळात लसीकरण अत्यावश्यक आहे, पण लस घेतल्यानंतरही लोकांना करोनाची लागण होत असल्यामुळे नागरिकांनी लस घेतल्यानंतरही करोना नियमावलीचे पालन करायला हवे. डबल म्युटेंटही निष्क्रिय करण्यात आलेले आहे. पण तरीही करोनाचा नवा स्ट्रेन लसीकरणात अडथळा निर्माण करू शकतो. कोणती लस करोनावर प्रभावी आहे आणि कोणती नाही, हे आताच सांगण घाईचे होईल. सीडीसी (अमेरिकेची रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्र) आणि एनआयएचच्या माहितीनुसार जी लस उपलब्ध होत असेल, ती घ्यायला हवी, असेही जाधव म्हणाले.

कोविशील्डचे उत्पादन वाढवणार

कोविशील्डचे उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच कोविड 19 विरोधातील लढाईत आम्ही सरकारच्या सोबत आहोत, असे सांगतानाच पुनावाला हेच आमच्या कंपनीचे एकमेव अधिकृत प्रवक्ते आहेत असेही सिंह यांनी पत्रात नमूद केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com