दिल्ली l Delhi

जगातील सात आश्चर्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या ताजमहल येथे बॉम्ब ठेवल्याचे माहिती समोर आली होती.

ताजमहल इमारत परिसरात अज्ञातांनी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर तातडीनं ताजमहालची तिन्ही गेट बंद करण्यात आले. बॉम्ब शोधक पथक परिसरात तातडीनं दाखल झाल्यानंतर शोध मोहीम सुरु झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा संपूर्ण परिसर पर्यटकांना बद करण्यात आला. मात्र या परिसरातील संपूर्ण तपासानंतर अखेर सत्य समोर आलं आहे. फिरोजाबाद पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाने आश्चर्यकारक माहिती दिली आहे. पोलीस चौकशीत या व्यक्तीनं आपणच खोटी धमकी देणारा फोन केल्याचं तरुणानं कबूल केलंय. भारतीय लष्करात दाखल होण्यासाठी या तरुणाचे प्रयत्न सुरू होते. परंतु, लष्कर भरती रद्द झाल्यानंतर तो नाराज झाला होता. त्यामुळे फेक कॉल केल्याचं तरुणानं पोलिसांसमोर कबूल केलं आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळी ९.३० च्या कंट्रोल रुमच्या माध्यमातून पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर ताजमहालच्या आत स्फोटकं ठेवण्यात आल्याची सूचना सुरक्षा यंत्रणांना एका अज्ञात फोन कॉलवरून मिळाली होती. 'ताजमहालात ठेवण्यात आलेल्या स्फोटकं थोड्याच वेळात फुटतील', अशी धमकी फोन करणाऱ्यानं दिली होती. त्यानंतर तत्काळ स्थानिक पोलिसांसोबत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला अलर्ट करण्यात आलं. बॉम्बविरोधी पथकही ताजमहाल परिसरात दाखल झालं. त्यानंतर पोलिसांनी ताजमहलचे पूर्व आणि पश्चिम दिशेची दोन्ही प्रवेशद्वारे बंद केली आहेत. यासोबतच ताजमहालच्या बाहेर असलेला बाजारही पोलिसांनी बंद केला. तर दुसरीकडे, पोलिसांनी हा फोन करणाऱ्या क्रमांकाला ट्रेस केलं. त्यानंतर हा फोन करणारा व्यक्ती फिरोजाबादचा असल्याचं पोलिसांच्या ध्यानात आलं. त्यानंतर त्या तरुणाला अटक करण्यात आली.