
दिल्ली | Delhi
तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. मलेरिया आणि डेंग्यूसारखे सनातन धर्माचे वर्णन करून त्याला विरोध करू नये, तर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. उदयनिधी यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद उद्धभवण्याची शक्यता आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांसह अनेकजण सोशल मीडियावर निषेध नोंदवत आहेत.
उदयनिधी म्हणाले की, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्यापेक्षा त्या रद्दबातल केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. सनातन धर्माला नुसता विरोध करू नये, त्यापेक्षा तो मूळापासून नष्ट करायला हवा. सनातन हे संस्कृत नाव आहे. हे सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांच्या या वक्तव्यावरून गोंधळ उडाला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आङे. त्यांनी उदयनिधी स्टॅलिन यांनी देशातील ८० टक्के लोकसंख्येच्या नरसंहाराचे अवाहन केल्याचा आरोप केला आहे. अमित मालवीय म्हणाले की, तमिळनाडुच्या मुख्यमंत्र्याचे पुत्र आणि डीएमके सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची मलेरिया आणि डेंग्यू सोबत तुलना केली. त्याचं म्हणणं आगहे की याचा फक्त विरोधच नव्हे तर हे नष्ट केले पाहिजे. थोडक्यात हे सनातन धर्माचे पालन करणाऱ्या ८० टक्के भारतीय लोकांच्या नरसंहाराचे अवाहन करत आहेत. डीएमके विरोधकांच्या आघाडीतील एक प्रमुख पक्ष आहे आणि काँग्रेसचा दिर्घ काळापासून सहकारी पक्ष आहे. मुंबईतील बैठकीत याबाबत देखील एकमत झालं होतं का?
सोशल मीडियावर विरोध असल्याचे पाहून उदयनिधी यांनी त्यांच्या एक्सवरुन (पूर्वीचे ट्विटर) प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणत्याही कायदेशीर आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे, असे स्टॅलिन म्हणाले. आम्ही अशा सामान्य भगव्या धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही पेरियार, अण्णा आणि कलैगनार यांचे अनुयायी आहोत. सामाजिक न्याय राखण्यासाठी आणि समतावादी समाजाची स्थापना करण्यासाठी नेहमीच लढा देऊ. मी आज, उद्या आणि सदैव हेच सांगेन, द्राविड भूमीतून सनातन धर्म बंद करण्याचा आपला संकल्प थोडाही कमी होणार नाही, असे उदयनिधी म्हणाले.