लशीची घाई धोकादायक ; शास्त्रज्ञांचा इशारा
देश-विदेश

लशीची घाई धोकादायक ; शास्त्रज्ञांचा इशारा

करोनावरची स्वदेशी लस 15 ऑगस्टपर्यंत तयार करण्याचे आयसीएमआरचे फर्मान

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई - करोनावरील लस भारतातच तयार केली जात असून, कोवाक्सिन असे या लसीचे नाव आहे. करोना अर्थात कोविड 19 वर देशात निर्माण केली जात असलेली ही लस स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जारी करण्याच्या सरकारच्या खटाटोपावर देशातील शास्त्रज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. आयसीएमआरने पुढील महिन्यात करोनावरची स्वदेशी लस स्वातंत्र्य दिनापर्यंत तयार झालीच पाहिजे, असे फर्मान संबंधित औषध कंपन्या, रुग्णालये व वैज्ञानिक संस्था यांना सोडल्याने त्यावर टीका होत आहे आहे.

वैज्ञानिकांनी याबाबत म्हटले आहे की, लशीची खूप निकड असली, तरी ती तयार करण्यासाठी अनेक महिने लागत असताना दोन महिन्यांच्या कालावधीत ती तयार करायला सांगणे, यात कुठलाच समतोल दिसत नाही. आयसीएमआर म्हणजे भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने लस स्वातंत्र्य दिनापर्यंत आणण्याची केलेली घोषणा आशादायी असली तरी त्यात धोकाही आहे.

प्रतिकारशक्ती विषयक तज्ज्ञ सत्यजित रथ यांनी सांगितले की, आयसीएमआरचे पत्र अयोग्य असून त्याची भाषा, आशय हा तांत्रिकदृष्टया वास्तववादी पातळीशी मेळ खाणारा नाही. दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इम्युनॉलॉजीचे प्रा. रथ यांनी या चाचण्यांकडे आपण आशादायी दृष्टिकोनातून पाहत असल्याचे स्पष्ट केले असून पुढे म्हटले आहे की, सार्स सीओव्ही लस घटक व त्याच विषाणूवरील डीएनए लस घटक आपण तयार केले आहेत. ही चांगली प्रगती आहे पण त्याचे निकाल काय येतात याची वाट बघावी लागेल.

विषाणूतज्ज्ञ उपासना राय यांनी सांगितले की, करोना विषाणूविरोधात लस तयार करण्याची घोषणा स्वागतार्ह आहे पण आपण त्यात जास्त घाई करीत नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. वैज्ञानिक व कंपन्यांवर जास्त दबाव टाकून सार्वजनिक वापरासाठी चांगली लस तयार करू शकू अशातला भाग नाही. उपासना राय या कोलकात्यातील आयआयसीबी-सीएसआयआर या संस्थेत वरिष्ठ वैज्ञानिक आहेत. त्यांनी सांगितले की, लस तयार करण्यासाठी 12 ते 18 महिने हे वैद्यकीय चाचण्यांसाठी लागतात. 15 ऑगस्ट या मुदतीचा विचार केला तर कंपन्यांकडे चाचण्यांसाठी एक महिनाच आहे. इतकी कमी मुदत त्यांनी कशी दिली. इतक्या कमी वेळात सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण होतील याचे पुरावे कोण देणार आहे. यातील सुरक्षा व औषध विकास तसेच इतर टप्प्यांचे काय, वैद्यकपूर्व अभ्यास तरी पूर्ण करण्यात आला आहे का, त्यामुळे जर जास्त घाई केली जात असेल तर त्यात जोखीम आहे यात शंका नाही. लशीमुळे किती प्रमाणात प्रतिपिंड तयार होतात याची चाचणी महत्त्वाची असते. त्यालाच महिना ते दोन महिने लागतात. नंतर लशीच्या सुरक्षा चाचण्या करून मग मानवी चाचण्यांना लस सिद्ध होते. काही काळ वाट पाहायलाच पाहिजे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com