
दिल्ली | Delhi
करोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा करोना विषाणूने डोकं वर काढले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतानेही चौथ्या लाटेला तोंड देण्यासाठी कंबर कसली आहे.
चीनमधील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेत भारत सरकारकडून नव्याने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात दाखल होण्यापूर्वी त्यांची सध्याची आरोग्य स्थिती सांगणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशांनंतर चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांना एअर सुविधा फॉर्म भरणे अनिवार्य असणार आहे.
तसेच केंद्र सरकारने फ्ल्यू किंवा इतर गंभीर आजारांच्या वाढत्या प्रसाराकडे लक्ष ठेवण्याच्या सूचनाही राज्यांना दिल्या आहेत. सगळ्या राज्यांनी कोव्हिड १९ संदर्भातली तयारी करून ठेवा आणि आरोग्य विषयक तयारी सुसज्ज ठेवा अशाही सूचना दिल्या आहेत. आपण आजवर करोनाच्या तीन लाटा पाहिल्या आहेत. जर करोनाची चौथी लाट आली तर त्या लाटेला तोंड देण्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं उचलावीत असंही केंद्र सरकारने सुचवलं आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत म्हणजे देशात २०१ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशात आतापर्यंत करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी ४६ लाखांच्या पार गेली आहे. देशात सध्या ३,३९७ सक्रिय करोना रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे.