दोन हजारांच्या नोटांची छपाई दोन वर्षांपासून बंद

केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची लोकसभेत माहिती
दोन हजारांच्या नोटांची छपाई दोन वर्षांपासून बंद

नवी दिल्ली -

गेल्या दोन वर्षांत दोन हजार रुपयांची एकही नवी नोट छापण्यात आलेली नाही अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री

अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती सभागृहाला दिली.

लेखी उत्तरामध्ये अनुराग ठाकूर यांनी2 हजारांची एकही नोट गेल्या 2 वर्षांत छापली नसल्याचं म्हटलं आहे. विशिष्ट किंमतीच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय केंद्र सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत सल्लामसलत करून घेत असते. यातून बाजारात नोटांच्या मागणीनुसार योग्य प्रमाणात नोटांचा पुरवठा ठेवता येतो. मात्र, 2019-20 आणि 2020-21 या दोन्ही आर्थिक वर्षांमध्ये 2 हजारांची एकही नोट छापली गेलेली नाही, असं त्यांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे.

अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मार्च 2018रोजी देशात 2 हजार रुपयांच्या 336 कोटी 20 लाख नोटा होत्या 26 फेब्रुवारी 2021मध्ये हाच आकडा 249 कोटी 90 लाख नोटांपर्यंत खाली आला. त्यामुळे बाजारातून 2 हजार रुपयांच्या नोटा कमी होऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने नोटा न छापण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, डिसेंबर 2016मध्ये देशभरात नोटबंदी लागू झाली. जुन्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या. त्यापाठोपाठ 500 च्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या आणि त्यासोबतच भारतीय बाजारपेठेतलं सर्वात मोठं चलन म्हणून 2 हजार रुपयांची नोट बाजारात आली. मोठ्या नोटांची संख्या वाढल्यास त्यातून काळा बाजार वाढू शकतो, अशी देखील एक टीका नोटबंदीनंतरच्या निर्णयांवर केली जात होती. मात्र, नोटबंदीचा परिणाम ठरलेल्या 2 हजारांच्या नोटा आता बाजारपेठेतून हद्दपार होताहेत की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com